भारतीय संघाचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आपल्या क्रिकेट कारकीर्दीत नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत शुक्रवारी मिचेल स्टार्कची विकेट घेऊन आणखी एका विक्रमाची नोंद केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात अश्विनने यंदाच्या मोसमातील ६४ वी विकेट घेतली. स्टार्कची विकेट घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत संपुष्टात आला. स्टार्कने मैदानात तग धरून ६० धावांची खेळी करून झुंज सुरू ठेवली होती.

अश्विनने ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांमध्ये २७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने २८ विकेट्स आपल्या खिशात जमा केल्या आणि बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत ६ विकेट्स अश्विनने आपल्या नावावर केल्या. तर सध्या पुण्यात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनने आतापर्यंत ३ विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेतील आणखी तीन सामने अद्याप शिल्लक आहेत.

 

माजी कर्णधार कपिल देव यांनी १९७९-८० मध्ये मायदेशात १३ कसोटी सामन्यांत ६३ विकेट्स घेतल्या होत्या. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कपिल देव यांनी २२.३२ च्या सरासरीने घेतलेल्या २८ विकेट्सचा समावेश होता. अश्विनने हा पराक्रम केवळ १० कसोटी सामन्यांमध्येच मोडीस काढला आहे. अश्विनने एकाच हंगामात झालेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये ६४ बळी घेण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.