भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला माझ्यासह संपूर्ण संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे विधान चेतेश्वर पुजारा याने गुरूवाऱी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. चेतेश्वर पुजाराने रांची कसोटीत द्विशतकी खेळी साकारून संघाला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली होती. पुजाराच्या खेळीमुळे संघाच्या विजयी आशा पल्लवित झाल्या होत्या. भारतीय संघ आता शनिवारी धर्मशाला येथे अखेरच्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. धर्मशाला कसोटीपूर्वी पुजाराने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुजाराला कोहलीबद्दल ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी केलेल्यी टीप्पणीबाबत विचारण्यात आले. त्यावेळी पुजारा म्हणाला की, कोहलीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. क्रिकेट खेळातील तो एक महान खेळाडू आहे. पण ऑस्ट्रेलियातील माध्यमांमुळे या मालिकेला वेगळेच वळण मिळत आहे. खेळाऐवजी वेगळ्याच गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केले जात आहे. हे दुर्देवी आहे. या गोष्टी बंद व्हायला हव्या. आम्ही अशा गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा खेळाकडे लक्ष केंद्रीत करण्याला प्राधान्य देत आहोत. त्यामुळे मैदानाबाहेर सुरू असलेल्या गोष्टींमुळे आम्हाला कोणताही फरक पडत नाही. धर्मशाला कसोटी जिंकून मालिका खिशात घालणे हेच आमचे लक्ष आहे, असे पुजारा म्हणाला.

 

ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी विराट कोहली याची तुलना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केल्यानंतर वाद सुरू झाला. पुजाराने त्यावरही नाराजी व्यक्त केली. कोहलीची केली गेलेली तुलना अतिशय दु:खद आहे, असे पुजाराने सांगितले. कोहलीवर करण्यात आलेल्या टीकेनंतर चाहते कोहलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांवर निशाणा साधला. कोहलीची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी कोहली एक अध्यक्ष आणि विजेता असल्याचे जणू त्यांनी मान्यच केले आहे. त्याबद्दल ऑस्ट्रेलियातील माध्यमांचे आभार मानायला हवेत, असे खोचक ट्विट बच्चन यांनी केले होते. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कनेही कोहलीच्या बाजूने मत व्यक्त केले होते. ऑस्ट्रेलियातील काही दोन-तीन पत्रकारांचा कोहलीला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप मायकेल क्लार्क केला होता.