भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्यानं क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर केलय. त्याची मैदानातील वादळी खेळी पाहण्यासाठी अनेक चाहते आतुर असतात. ज्यावेळी तो मैदानात उतरतो त्यावेळी उपस्थित प्रेक्षक त्याला प्रोत्साहन देताना दिसतात. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भुवीच्या एका स्टेट ड्राईव्हवर पांड्यांच्या चाहत्यांमध्ये शांतता पसरल्याचे पाहायला मिळाले. भारतीय डावाच्या ४७ व्या षटकात भुवनेश्वरनं मारलेला एक फटका नॉन स्टाईकवर असणाऱ्या पांड्याला जोरदार लागला. यावेळी चेंडूपासून वाचण्याचा प्रयत्न करताना पांड्या जमिनीवर पडला. वेगाने आलेला हा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला. या क्षणानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह पंच आणि प्रेक्षकात शांतता पसरल्याचे पाहायला मिळाले.

पांड्याला चेंडू लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथसह अन्य खेळाडूंनी त्याच्या दिशेनं धाव घेतली. फिलिप ह्युजच्या दुर्घटनेवेळी मैदानात असणारे काही खेळाडू सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघात आहेत. त्यांना अशा घटनेचा धक्का काय असतो याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच भुवनेश्वरचा पांड्याला लागलेल्या चेंडूनंतर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव चिंताजनक झाल्याचे पाहायला मिळाले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यातील षटकाराच्या हॅट्ट्रिकसह दमदार अर्धशतकी करणाऱ्या पांड्याने दुसऱ्या सामन्यात २ चौकाराच्या मदतीनं २० धावा केल्या. यासाठी त्याने २४ चेंडूचा सामना केला. याशिवाय दोन बळी देखील मिळवले. विराट कोहली मैदानावर असताना या सामन्यात भारतीय संघ ३०० धावांचा पल्ला गाठेल, असे वाटत होते. मात्र तो बाद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजीला लगाम घालण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश आले. परिणामी निर्धारित ५० षटकात भारताला २५२ धावांपर्यंत मजल मारता आली. कोहलीच्या दमदार खेळीनंतर कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी तीन तर पांड्या आणि युजवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला २०२ धावात गुंडाळले. भारताने हा सामना ५० धावांनी जिंकला असून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.