धर्मशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरेल असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन यांचे म्हणणे आहे. फॉक्स स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जॉन्सनने धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकून मालिका खिशात घालेल असा विश्वास व्यक्त केला. धर्मशालाच्या खेळपट्टीवर मी खेळलो आहे. खेळपट्टीवर थोडे गवत असते. त्यामुळे वेगवान गोलंदाजीला मदत मिळेल असे मला वाटते. त्यामुळे कमिन्स आणि हेजलवूडचा वेगवान मारा भारतीय फलंदाजांची झोप उडवेल. त्याउलट स्मिथ आणि इतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजीचा सामना सहजपणे करू शकतील, असे जॉन्सनने म्हटले.

वाचा: ‘जशास तसे..’, कोहलीकडून ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला ‘त्या’ प्रसंगांची आठवण

 

ऑस्ट्रेलियाने धर्मशालामध्ये एका फिरकीपटूला बसवून आणखी एका वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश करावा, असा सल्ला देखील जॉन्सनने दिला आहे. खेळपट्टी वेगवान असल्याने एका फिरकीपटूला आराम देऊन संघात आणखी एका वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात हरकत नसावी, असे जॉन्सन म्हणाला. तिन्ही कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही फिरकीपटूंनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे कोणत्या फिरकीपटूला आराम द्यावा याची निवड करणे खरंच खूप कठीण आहे. पण अनुभवाला येथे प्राधान्य देऊन निवड करण्यात यावी, असेही जॉन्सन म्हणाला.

वाचा: कोहलीच्या समर्थनार्थ ‘बिग बीं’ची ऑस्ट्रेलियन माध्यमांविरुद्ध ‘बॅटिंग’

नॅथन लियॉनला धर्मशालाच्या खेळपट्टीवर चांगली उसळी मिळू शकते आणि तो चेंडू चांगला वळवू शकतो, तरीसुद्धा तुम्हाला डावखुऱया गोलंदाजाचा संघात समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे. पण ऑस्ट्रेलियासारखी खेळपट्टी धर्मशालामध्ये असेल तर नक्कीच संघात नॅथन लियॉनचा समावेश असावा आणि तिसऱया गोलंदाजाच्या भूमिकेत जॅक्सन बर्ड याचा समावेश संघात करण्यात यावा, असे जॉन्सनने म्हटले.