चेन्नईतील पावसामुळे पहिला एकदिवसीय सामना ५० षटकांऐवजी २१ षटकांचा कमी करावा लागला होता. आता कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावरही पावसाचे सावट आहे.

मंगळवारी मुसळधार पावसाने कोलकाता शहराला झोडपले. त्यामुळे ईडन गार्डन्स स्टेडियमचे मैदान आच्छादनाने झाकण्यात आले आहे. गेले दोन दिवस कोलकातामध्ये हा पाऊस पडत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने इनडोअर सरावाला पसंती दिली, तर भारतीय क्रिकेट संघाला सराव रद्द करावा लागला.

‘‘फक्त दोन तास पावसाने विश्रांती घेतली, तरी आम्ही मैदान खेळण्यासाठी सज्ज करू. आमच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत आहेत. सामन्यासाठी आणखी दोन दिवस आहेत, ही चांगली गोष्ट आहे,’’ अशी माहिती पूर्व विभागाचे खेळपट्टीतज्ज्ञ आशीष भौमिक यांनी दिली.