भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. येत्या शनिवारी धर्मशाला येथे शेवटची कसोटी खेळविण्यात येणार आहे. दोन्ही संघांकडे मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे शेवटचा सामना निर्णायक ठरणार आहे.

 

दोन्ही संघ कसोटी क्रमवारीतील मातब्बर संघ असल्याने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. गेल्या तीन कसोटींमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंमध्ये उडालेले खटके पाहता ही मालिका सध्या क्रिकेटविश्वात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने तर या मालिकेची तुलना थेट ‘अॅशेस’ मालिकेसोबत केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या होणाऱया अॅशेस मालिकेता कसोटी विश्वात वेगळे स्थान आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे परस्परांचे प्रतिस्पर्धी संघ आहेत. अॅशेस मालिकेकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून असते. दोन्ही संघ अॅशेस मालिकेच्या विजेतेपदासाठी झटत असतात. मायकेल क्लार्कने ऑस्ट्रेलियाच्या संघाची सध्या भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेली मालिका ‘अॅशेस’ मालिकेसारखीच असल्याचे म्हटले आहे. या मालिकेतून मला २००५ साली झालेल्या अॅशेस मालिकेची आठवण झाली, असे क्लार्क म्हणाला.

२००५ साली झालेली ‘अॅशेस’ मालिका देखील स्लेजिंग आणि वादाच्या पार्श्वभूमीवर खूप गाजली होती. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेले ‘मंकीगेट’ प्रकरणही दोन्ही संघांसाठी लाजीरवाणी ठरली होते.