ऑस्ट्रेलियाचा लेग-स्पिनर अ‍ॅडम झम्पाच्या एका षटकात हार्दिक पंडय़ाने २४ धावा चोपल्या होत्या. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ते षटक निर्णायक ठरले होते. हार्दिकविरोधात माझी रणनीती वापरण्यात अपयशी ठरलो, अशी कबुली झम्पाने दिली.

‘‘दडपणाच्या स्थितीत मला उत्तम गोलंदाजी करता येते. परंतु हार्दिक फलंदाजीला असतानाच्या त्या षटकात मला योग्य पद्धतीने योजना राबवता आल्या नाहीत. त्याला जेरबंद करण्याची आवश्यकता होती,’’ असे झम्पाने सांगितले. हार्दिकने झम्पाच्या ३७व्या षटकात तीन सलग षटकार ठोकले होते.

भारत दौऱ्यासाठी २५ वर्षीय झम्पा हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फिरकीचे अस्त्र मानले जात होते. आशियाई खंडातील आव्हानाविषयी झम्पा म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलिया आणि भारतातील  खेळपट्टय़ा आणि वातावरण भिन्न असते. त्यामुळे गोलंदाजीत त्या पद्धतीने परिवर्तन करावे लागते. माझ्या गोलंदाजीवर आजपर्यंत कुणीही तीन सलग षटकार खेचले नव्हते. परंतु क्रिकेटमध्ये असे घडते. अगदी शेन वॉर्नसारख्या जगातील अव्वल फिरकीपटूच्या वाटय़ालाही हे आले होते. दडपणातील ही परिस्थिती आपल्याला बरेच काही शिकवते. पुढील सामन्यात मी त्याला लवकर बाद करण्यात यश मिळवेन, अशी आशा आहे.’’

रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा आपला सहकारी महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीची झम्पाने मुक्तकंठाने स्तुती केली. झम्पा म्हणाला, ‘‘धोनीने अशा खेळी बऱ्याचदा साकारल्या आहेत. त्यापैकी अनेक खेळी या दडपणाखालील स्थितीतल्या आहेत. त्यामुळेच हार्दिक आणि संघातील अन्य युवा खेळाडूंसाठी तो उत्तम मार्गदर्शक ठरतो.’’