ब्रिस्बेनला अॅडलेडची पुनरावृत्ती शनिवारी पाहायला मिळाली. भारतीय फलंदाजी पुन्हा पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. फलंदाजांनी गाबावर अक्षरश: शोभा केली. मग भारतीय गोलंदाजांनी कमाल करीत अंधुकशी आशा निर्माण केली. परंतु अपुऱ्या आव्हानापुढे आशेचे मिणमिणते दिवे चौथ्या दिवशीच विझून गेले. दुसऱ्या कसोटीत चार विकेट राखून विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
१ बाद ७१ वरून भारताने आपला दुसरा डाव पुढे सुरू केला, परंतु सकाळच्या सत्रात १६ धावांमध्ये आणि चार षटकांमध्ये चार भरवशाचे फलंदाज तंबूत परतले. ऑस्ट्रेलियाचा तेज गोलंदाज मिचेल जॉन्सनने लागोपाठच्या षटकांत विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांना माघारी पाठवले आणि त्यानंतर ६४.३ षटकांत जेमतेम २२४ धावसंख्येवर भारताची फलंदाजी आटोपली.
त्यानंतर १२८ धावांचे तुटपुंजे आव्हान स्वीकारताना ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज बाद झाले. परंतु सामना यजमानांच्या हातून निसटला आहे, अशी स्थिती मात्र अजिबात नव्हती. ख्रिस रॉजर्सने (५७ चेंडूंत १० चौकारांसह ५५ धावा) स्टीव्हन स्मिथ (२८) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करून विजयाची पायाभरणी केली. मग वरुण आरोनच्या गोलंदाजीवर मिचेल मार्शने कव्हर ड्राइव्हला चौकार खेचून चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि विजयाचा अभूतपूर्व जल्लोष गाबावर साजरा झाला. स्मिथने शतकाप्रमाणेच विजयानिशी आपल्या नेतृत्वाची यशस्वी सुरुवात केली आणि सामनावीर पुरस्काराचा मान मिळवला.
सकाळपासून भारतासाठी कोणतीही गोष्ट अनुकूल होत नव्हती. नियमित सलामीवीर आणि आदल्या दिवशी नाबाद राहिलेला फलंदाज शिखर धवन फलंदाजीला उतरला नाही. सामन्याआधीच्या सराव सत्रात धवनच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. त्यामुळे चेतेश्वर पुजारासोबत विराट कोहली (१) फलंदाजीला उतरला. जॉन्सनने कोहलीचा त्रिफळा उडवला आणि मग भारताची घसरगुंडी उडाली. मग उपाहारानंतर दुखापतींची तमा न बाळगता धवनने मैदानावर येत आपले दुसरे अर्धशतक नोंदवले. धवन शतकाकडे कूच करीत असताना नॅथन लिऑनने त्याला पायचीत केले. त्याने १४५ चेंडू किल्ला लढवत ८ चौकारांसह झुंजार ८१ धावा केल्या. धवनने उमेश यादव (३०) सोबत आठव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताला किमान तीन आकडी आव्हान कांगारूंपुढे ठेवता आले. जॉन्सनने ६१ धावांत ४ बळी घेतले, तर जोश हॅझलवूड, मिचेल स्टार्क आणि लिऑन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी मारू लागल्यामुळे भारतीय फलंदाजांची पंचाईत झाली. फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्याने हा पराभव भारताच्या वाटय़ाला आला असला तरी पंचांचे काही निर्णयसुद्धा त्याला कारणीभूत ठरले. रोहित शर्मा (०) आणि रविचंद्रन अश्विन (१९) चुकीच्या निर्णयाचे बळी ठरले. टीव्ही रीप्लेमध्ये यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिनने टिपलेल्या झेलप्रसंगी त्यांच्या बॅटची कड लागलीच नसल्याचे स्पष्ट झाले.
आता ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ मेलबर्नला रवाना होतील. बोर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे राखण्यासाठी आता ऑस्ट्रेलियाच्या संघाला तिसरी कसोटी जिंकणे किंवा अनिर्णीत राखण्याची आवश्यकता आहे.

पराभव हा निराशाजनक आहे. परंतु त्याची कारणे जाणणे महत्त्वाचे असते. मगच त्यात सुधारणा करता येईल. सकाळचे पहिले सत्र आमच्यासाठी महत्त्वाचे होते आणि ते आम्हाला योग्य पद्धतीने हाताळता आले नाही. खेळपट्टी फलंदाजांसाठी धोकादायक होती, परंतु चांगल्या भागीदाऱ्या आणि जास्त धावा होणे आवश्यक होते.
– महेंद्रसिंग धोनी

..हे हारणं बरं नव्हं!
या पराभवानिशी परदेशातील आपल्या अपयशाची मालिका कायम राहिली. गेल्या साडेतीन वर्षांत भारतीय उपखंड सोडल्यास भारताने पत्करलेला हा १५वा कसोटी पराभव ठरला. परदेशातील अपयशाने महेंद्रसिंग धोनीचाही पिच्छा सोडलेला नाही. त्याचा हा १४वा कसोटी पराजय आहे. २०११पासून इंग्लंडमधील सात, ऑस्ट्रेलियातील चार तसेच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रत्येकी एकेका कसोटी सामन्याचा समावेश आहे.

धावफलक
भारत (पहिला डाव) : ४०८.
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५०५.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय त्रिफळा गो. स्टार्क २७, शिखर धवन पायचीत गो. लिऑन ८१, चेतेश्वर पुजारा झे. लिऑन गो. हॅझलवूड ४३, विराट कोहली त्रिफळा गो. जॉन्सन १, अजिंक्य रहाणे झे. लिऑन गो. जॉन्सन १०, रोहित शर्मा झे. हॅडिन गो. जॉन्सन ०, महेंद्रसिंग धोनी पायचीत गो. हॅझलवूड ०, आर. अश्विन झे. हॅडिन गो. स्टार्क १९, उमेश यादव झे. हॅडिन गो. जॉन्सन ३०, वरुण आरोन झे. हॅझलवूड गो. लिऑन ३, इशांत शर्मा नाबाद १, अवांतर (लेगबाइज २, वाइड ५, नोबॉल २) ९, एकूण ६४.३ षटकांत सर्व बाद २२४.
बाद क्रम : १-४१, २-७६, ३-८६, ४-८६, ५-८७, ६-११७, ७-१४३, ८-२०३, ९-२११, १०-२२४
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन १७.३-४-६१-४, जोश हॅझलवूड १६-०-७४-२, मिचेल स्टार्क ८-१-२७-२, शेन वॉटसन १३-४-२७-०, नॅथन लिऑन १०-१-३३-२.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ख्रिस रॉजर्स झे. धवन गो. इशांत ५५, डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. इशांत ६, शेन वॉटसन झे. धोनी गो. इशांत ०, स्टीव्ह स्मिथ धावचीत २८, शॉन मार्श झे. धोनी गो. यादव १७, ब्रॅड हॅडिन झे. कोहली गो. यादव १, मिचेल मार्श नाबाद ६, मिचेल जॉन्सन नाबाद २, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ४, वाइड १, नोबॉल ६) १५, एकूण २३.१ षटकांत ६ बाद १३०. बाद क्रम : १-१८, २-२२, ३-८५, ४-११४, ५-१२२, ६-१२२.
गोलंदाजी : इशांत शर्मा ९-२-३८-३, उमेश यादव ९-०-४६-२, वरुण आरोन ५.१-०-३८-०.