मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात भारताने १ बाद १०८ इतकी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाला ५३० धावांचा टप्पा गाठून देणाऱ्या कर्णधार स्मिथने क्षेत्ररक्षणातही चपळाई दाखवत भारतीय सलामवीर शिखर धवनचा सुंदर झेल टिपला. शिखर धवन २८ धावा करून तंबुत परतला. त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत खेळपट्टीवर तळ ठोकला. मुरली विजय आणि पुजारा दिवसअखेर अनुक्रमे ५५ आणि २५ धावांवर नाबाद आहेत. दरम्यान, उद्या या जोडीकडून भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा आहे.
तत्पूर्वी कर्णधार स्टिव्हन स्मिथने केलेल्या १९२ धावा आणि तळाच्या फलंदाजांनी त्याला दिलेली साथ यांमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ५३० धावांचा टप्पा गाठता आला. ५ बाद २५९ धावसंख्येवरून डावाला सुरूवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला वेसण घालण्यात शनिवारी भारतीय गोलंदाजांना अपयश आले. स्मिथने १९१ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारासह आपले शतक पूर्ण केले. स्मिथचे कसोटी कारकीर्दीतील हे सातवे, तर या मालिकेतील सलग तिसरे शतक आहे. त्यामुळे फलंदाजीला अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज काय करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

‘बॉक्सिंग’चा पहिला दिवस बरोबरीत