पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यामुळे बेंगळूरुत गुरुवारी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यावरही पावसाचे सावट आहे.

गेल्या २४ तासांपासून शहरात पावसाचा वर्षांव सुरू आहे. हवामान खात्याकडे ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास किमान कमी षटकांचा खेळ व्हावा, या हेतूने चिन्नास्वामी स्टेडियमचे खेळपट्टीतज्ज्ञ युद्धपातळीवर कार्यरत आहेत. या स्टेडियमवर पाण्याचा निचरा होण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान कार्यरत आहे. त्यामुळे मोठय़ा पावसानंतरही पंचांना काही मिनिटांत मैदान खेळण्यासाठी सज्ज करता येईल.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे पावसामुळे बरेच नुकसान झाले आहे. चेन्नईच्या पहिल्या सामन्यात दोन तास पावसामुळे खेळाचे नुकसान झाले होते. त्यामुळे पंचांनी सामना २१ षटकांचा केला होता. कोलकाता सामन्याआधी दोन्ही संघांना बंदिस्त भागात सराव करता आला होता. इंदूरलाही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती, परंतु सुदैवाने वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे खेळ व्यवस्थित झाला.