सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशी चिवट फलंदाजी करून भारताचा डाव सावरणारा आर.अश्विन दुसऱ्या डावात यजमानांना आपल्या गोलंदाजीचीही किमया दाखवत आहे. अश्विनने आतापर्यंत ४ फलंदाजांना माघारी धाडले तर, मैदानावर तग धरून असलेल्या स्मिथला मोहम्मद शमीने ७१ धावांवर पायचीत केले. जो बर्नस् याने दिवसाच्या अखेरीस तुफान फटकेबाजी करून ५६ चेंडुत ६६ धावा ठोकल्या. बर्नस् याला ब्रॅड हॅडिनने चांगली साथ दिली. चौथ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ६ बाद २५१ अशी झाली असून ३४८ धावांची आघाडी यजमानांकडे आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी उपहारानंतर भारताचा पहिला डाव ४७५ धावांवर संपुष्टात आल्यामुळे ऑस्ट्रेलियला ९७ धावांची आघाडी मिळाली. मात्र, आर.अश्विनच्या गोलंदाजीवर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर झटपट बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची सुरूवात काहीशी डळमळीत झाली. त्यानंतर अश्विनने शेन वॉटसन(१६) आणि शॉन मार्शला अवघ्या एका धावेवर माघारी धाडले. तर दुसरीकडे भुवनेश्वर कुमारने क्रिस रॉजर्सला ५६ धावांवर बाद केले. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ एका बाजूने ठामपणे किल्ला लढवला.
चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या सत्रातच विराट कोहली आणि वृद्धिमान सहा झटपट बाद झाले. त्यामुळे भारताचा गाशा झटपट गुंडाळला जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, आर. अश्विनने  आणि भुवनेश्वर कुमार यांनी खेळपट्टीवर ठाण मांडत संघाचा डाव सावरला. मात्र, ३० धावांवर असताना नॅथन लायनच्या गोलंदाजीवर भुवनेश्वर कुमार बाद झाला.  या दोघांनीही आठव्या विकेटसाठी ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. अश्विनने ११० चेंडूत नाबाद अर्धशतक झळकावत भारताला ४५० धावांची वेस ओलांडून दिली.
तत्पूर्वी विराट कोहलीने २३० चेंडूंत २० चौकारांसह १४७ धावांची खेळी केली. तर साहाने ९६ चेंडूंत ३ चौकारांसह ३५ धावांची खेळी केली. कोहली आणि साहाने सहाव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली.