क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, असे म्हटले जाते. परिस्थिती एकसारखी कधीच राहत नाही. ती क्षणागणिक बदलत जाते. कधी होत्याचे नव्हते, तर नव्हत्याचे होते करून दाखवते. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलताना जो कणखरता दाखवतो, तोच यशस्वी ठरतो, असेच काहीसे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचे वर्णन करता येईल. कधी पारडे भारताच्या तर कधी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकताना ‘बॉक्सिंग डे’ला सुरू झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांकडून चांगलीच ‘बॉक्सिंग’ पाहायला मिळाली आणि सामन्याच्या सलामीचा दिवस बरोबरीतच सुटला. एकही धाव नसताना ऑस्ट्रेलियाने गमावलेला सलामीवीर, त्यानंतर तीन अर्धशतके आणि त्यानंतर ठरावीक  अंतराने पडणाऱ्या विकेट्स हे आजच्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. पहिल्या दिवसअखेर तीन अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५ बाद २५९ अशी मजल मारली असून दुसऱ्या दिवसावर साऱ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि संघाचा भोपळाही फुटलेला नसताना त्यांनी फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नरला गमावले. भारतासाठी ही शुभदायक सुरुवात होती, पण भारताला या संधीचे सोने करता आले नाही. सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणि शेन वॉटसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचत संघाला स्थिरस्थावर केले. पण ११५ धावांवरच हे दोघेही बाद झाले आणि पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडला. भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची ही दुसरी संधी होती. पण कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या संयमी फलंदाजीमुळे भारताची ही संधीदेखील हुकली. रॉजर्सने ५ चौकारांच्या जोरावर ५७ धावांची खेळी साकारली, तर वॉटसनने ४ चौकारांच्या जोरावर ५२ धावा फटकावल्या.
स्मिथला झटपट बाद करण्याची किल्ली अजूनही भारतीय संघाला सापडलेली नसल्याचेच आतापर्यंत दिसून आले आहे. समोरच्या टोकाकडून फलंदाज परतत असतानादेखील स्मिथने आपल्या स्वाभाविक खेळाला मुरड घालत खेळपट्टीवर पाय रोवून पहिला दिवस शांतपणे खेळून काढला. स्मिथने १५८ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या दिवशी साऱ्यांच्याच नजरा स्मिथच्या शतकाकडे खिळलेल्या असतील. त्याचे शतक होते की पुन्हा एकदा क्रिकेटमधली अनिश्चितता डोके वर काढते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
भारताकडून उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी भेदक मारा करत प्रत्येकी दोन बळी मिळवले, तर फिरकीपटू आर. अश्विनला एक बळी मिळवता आला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ख्रिस रॉजर्स झे. धोनी गो. शमी ५७, डेव्हिड वॉर्नर झे. धवन गो. यादव ०, शेन वॉटसन पायचीत गो. अश्विन ५२, स्टिव्हन स्मिथ खेळत आहे ७२, शॉन मार्श झे. धोनी गो. शमी ३२, जो बर्न्स झे. धोनी गो. यादव १३, ब्रॅड हॅडिन खेळत आहे २३, अवांतर (बाइज १, लेग बाइज ६, वाइड १, नो बॉल २) १०, एकूण ९० षटकांत ५ बाद २५९.
बाद क्रम : १-०, २-११५, ३-११५, ४-१८४, ५-२१६.
गोलंदाजी : इशांत शर्मा २१-६-५४-०, उमेश यादव २०-२-६९-२, मोहम्मद शमी १७-४-५५-२, आर. अश्विन २७-७-६०-१, मुरली विजय ५-०-१४-०.

शतक  न झाल्याने निराश  – शेन वॉटसन
अर्धशतकाची नोंद करत मोठय़ा खेळीसाठी पायाभरणी केली. मात्र शतक पूर्ण करता न आल्याने मी निराश आहे. मी स्वाभाविकपणे फटका खेळलो. खेळताना मी फार पुढचा विचार करत नव्हतो. मात्र चांगल्या सुरुवातीनंतर बाद होणे मला टाळले पाहिजे.

धावा रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो – मोहम्मद शमी
योजनेनुसार गोलंदाजी करणे आमचे उद्दिष्ट होते आणि आम्ही तशीच गोलंदाजी केली. धावा रोखणे आणि विकेट्स काढणे या दोन्ही आघाडय़ांवर आम्ही यशस्वी झालो. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ कोणत्याही स्थितीतून पुनरागमन करू शकतो, म्हणूनच शनिवारचे पहिले सत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. वेगवान गोलंदाजांना थोडा त्रास सतावतोय, मलाही थोडा त्रास जाणवला, मात्र उर्वरित दिवशी गोलंदाजीसाठी मी तंदुरुस्त आहे. वेगापेक्षा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यावर भर दिला.