भारत-ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला लोळवले आहे. आता या दोन्ही संघांमध्ये रविवारी इंदूरमधील होळकर मैदानात तिसरी एकदिवसीय लढत होणार आहे. मैदान कुठलेही असो, भारताला त्यांच्यात भूमीत हरवणे कठीण आहे, असे ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाज इंदूरच्या मैदानावर खेळणार आहे. या सामन्याआधी डेव्हिड वॉर्नरने पत्रकार परिषद घेतली. आम्ही याआधी कधीच इंदूरच्या मैदानावर खेळलो नाही. भारताला त्यांच्यात भूमीत पराभूत करणे कठीण आहे. खेळपट्टी चांगली असून सीमारेषा जवळ आहे. आम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करावी लागेल. भारतातील खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल असतात. त्यामुळे चांगला खेळ करणे हाच तुमच्याकडे एकमेव पर्याय असतो, असे वॉर्नर म्हणाला.

चेन्नई आणि कोलकात्यातील सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. भारतीय फिरकीपटूंच्या ‘फिरकी’त ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज अडकल्याचे पाहायला मिळाले. युझवेंद्र चहल आणि कुलदीप या दोन गोलंदाजांनी आपल्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंची ‘पळता भुई थोडी…’ केली आहे.

इंदूरमध्ये होणाऱ्या सामन्याविषयी बोलताना वॉर्नरने चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली आहे. आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिल्यास चहल आणि कुलदीपवर दबाव निर्माण करता येईल, असे तो म्हणाला. दोन्ही गोलंदाजांविरुद्ध रणनिती तयार करण्याची गरज आहे. फलंदाज लागोपाठ बाद झाले तर संघ दबावात खेळतो. पण चांगली सुरुवात मिळाली तर फिरकी गोलंदाजीवरही चांगल्या धावा वसूल करता येतात, असेही त्याने सांगितले. विशेष म्हणजे, दोन्ही लढतींमध्ये चहल आणि कुलदीपने आपल्या फिरकीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले होते.