वयाच्या ११ व्या वर्षी तो क्रिकेट अकादमीत गेला…टेबल टेनिस आवडत असूनही वडिलांच्या आग्रहाखातर तो क्रिकेटचे धडे गिरवू लागला…वसीम अक्रमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याला वेगवान गोलंदाज व्हायचे होते…पण प्रशिक्षक कपिल पांडे यांनी त्याला फिरकी गोलंदाजी करायचा सल्ला दिला..गुरुचा आदेश मानत त्याने फिरकी गोलंदाजीचे धडे गिरवले आणि बरोबर ११ वर्षांनी हा पठ्ठ्या टीम इंडियाचा नवोदित तारा ठरला… हा थक्क करणारा प्रवास आहे उत्तरप्रदेशचा २२ वर्षीय कुलदीप यादवचा.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धरमशाला कसोटीत भारतीय संघात कुलदीप यादव या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांची कुलदीपने यादवने दाणादाण उडवली आणि रातोरात कुलदीप भारतीय क्रिकेटमधला ‘तारा’ ठरला. पण कुलदीपचा हा प्रवास इतका सोपा नाही. कानपूरमधून आलेल्या कुलदीप यादवच्या वडीलांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. रामसिंह यांना त्यांचा लहान भाऊ जनार्दनसिंहने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवावी असे वाटत होते. लहान भावाला रामसिंह यांनी प्रोत्साहनही दिले. जनार्दनसिंह यांना जिल्हा पातळीवरपर्यंतच मजल गाठता आली. भावाच्या अपयशाने रामसिंह खचले नाही. रामसिंह यांनी भावाऐवजी आता मुलावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला.

अकराव्या वर्षी कुलदीप क्रिकेट अकादमीत गेला. क्रिकेटकडे फक्त टाईमपास म्हणून बघणारा कुलदीपला क्रिकेटमध्ये करियर घडवू असे स्वप्नातही वाटले नव्हते. प्रशिक्षणाच्या काळात कुलदीपला क्रिकेटची गोडी लागली. वसीम अक्रम आदर्श असल्याने कुलदीपला वेगवान गोलंदाजच व्हायचे होते. पण प्रशिक्षक कपिल पांडे यांनी शिष्यामधील गूण अचूक हेरले. पांडे यांनी कुलदीपला फिरकी गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला आणि त्याला त्यानुसार धडेही दिले. गुरु कपिल पांडेच्या मार्गदर्शनाखाली कुलदीपची गोलंदाजी बहरत गेली. राष्ट्रीय पातळीवर छाप पाडल्यावर आता कुलदीपला भारतीय संघाचे दार उघडले आहे. क्रिकेट क्षेत्रात असताना कुलदीपचे आणखी एक स्वप्नही पूर्ण झाले. वसीम अक्रमला भेटण्याचा योगही कुलदीपच्या नशीबी आला. कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक म्हणून काम करताना वसीम आणि कुलदीप यादवची भेट झाली होती. शनिवारी भारतीय संघात पुनरागमन करताना कुलदीप काहीसा भावूक झाला होता.