ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं भारताच्या डावाला चांगली सुरुवात करुन दिली. मुंबईकर जोडी स्थिरावली असताना कुल्टर नाईलनं भारतीय डावाला सुरुंग लावला. त्यानं रोहितला ७१ धावांवर बाद केलं. रोहितनंतर नेहमीप्रमाणे विराट कोहली मैदानात आला. त्यानंतर अजिंक्य राहणेही बाद झाला. भारताला दुसरा धक्का बसल्यानंतर चौथ्या क्रमांकावर मनिष पांडे येणं अपेक्षित होतं. मात्र यावेळी मैदानात हार्दिक पांड्याची एन्ट्री झाली. हार्दिक पांड्याला दिलेल्या बढतीमुळं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. समालोचन करत असलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना पांडेच्याजागी पांड्याला पाठवण्याची भारतीय संघाची रणनिती सुरुवातीला फारशी रुचली नाही. मात्र पांड्याची फटकेबाजी पाहून त्यांनी पांड्याच कौतुक केल्याचही पाहायला मिळालं.

अॅगरच्या फिरकीमुळे भारतीय फलंदाजीची धावगती मंदावू नये, यासाठी खास पांड्याला बढती दिल्याचं समालोचकांनी अंदाज वर्तवला. समालोचकांचा हा अंदाज पांड्यानं खराही ठरवला. अॅगरला त्यानं केलेल्या फटकेबाजीमुळे स्मिथला दोन्ही बाजूंनी जलदगती गोलंदाजांना आणावे लागले. परिणामी विराट आणि पांड्याने भारताचा धावफलक हलता ठेवला. या सामन्यात पांड्यानं ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं ७२ चेंडूत ७८ धावांची धडाकेबाज फलंदाजी करत मिळालेल्या संधीच सोनं केलं. पांड्याच्या फटकेबाजीमुळं कांगारुंची गोलंदाजी भरकटल्याचं दिसले.

कर्णधार विराट कोहली त्याच्या या खेळीनं चांगलाच प्रभावित झाल्याचे सामन्यानंतर पाहायला मिळाले. विराटने त्याच्या शैलीत आपल्या स्टारची ओळख करुन दिली. पांड्या हा सामन्याचं चित्र बदलणारा सुपरस्टार आहे, या शब्दांत विराटनं त्याचं कौतुक केलं. सामन्यानंतर बक्षीस समारंभावेळी सामनावीरचा पुरस्कार प्रदान करत असताना ज्यापद्धतीने खेळाडूच्या नावाची घोषणा केली जाते, अगदी त्याच अंदाजात विराटने अंगठ्याचा माईक करत पांड्याची मुलाखत घेतली. बढती दिल्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न त्याने पांड्याला विचारला. पांड्यानंही कर्णधाराला प्रतिसाद देत हसत मुखानं त्याला आलेला अनुभव सांगितला. त्यानंतर आणखी दोन सामने बाकी आहेत, असं सांगत विराटनं भारतीय संघ व्हाईटवॉशसाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले. कोहलीनं ट्विटर अकाउंटवरुन पांड्यासोबतचा हा व्हिडिओ शेअर केला असून पांड्याच्या कामगिरीबद्दल नेटीझन्स त्याला शुभेच्छा देताना दिसते आहे.