’केफीच्या सहा बळींमुळे भारताचा १०५ धावांत खुर्दा; ऑस्ट्रेलियाकडे २९८ धावांची आघाडी

करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशी अवस्था भारताची झाली आहे. गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी बनवण्याचा हट्ट भारताच्याच अंगलट आला. स्टीव्ह ओ’केफीच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ऑॅस्ट्रेलियाने भारताचा डाव फक्त १०५ धावांत गुंडाळला आणि पहिल्या कसोटी सामन्यावरील पकड घट्ट केली.

गहुंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यासाठी भारतीय गोलंदाजांना धार्जिणी अशी खेळपट्टी बनवण्यात आली. मात्र हेच अस्त्र भारतावर उलटले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ४ बाद १४३ धावा करीत २९८ धावांची आघाडी मिळवली आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथने केलेल्या नाबाद ५९ धावा आणि त्याने मॅट रेनशॉच्या (३१) साथीने केलेली अर्धशतकी भागीदारी, हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन-चार जीवदाने देत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अप्रत्यक्षरीत्या साथ दिली.

आत्मघातकी फलंदाजी हे भारतीय फलंदाजांची जुनीच सवय आहे, याचा प्रत्यय पुन्हा घडला. सलामीवीर लोकेश राहुलने केलेल्या शानदार अर्धशतकाचा अपवाद वगळता भारताचा एकही फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्यामुळेच अवघ्या तीन तासांतच भारताचा पहिला डाव आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याला क्षेत्ररक्षकांनी तोलामोलाची साथ दिली.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या २६० धावांना उत्तर देताना भारताची एक वेळ ३ बाद ९४ अशी चांगली स्थिती होती. मात्र उपाहारानंतर ओ’केफीने केवळ ४.१ षटकांत पाच धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेत सामन्याचा रंगच पालटवला. त्यातही त्याने एकाच षटकांत तीन बळी घेत भारताला जबरदस्त धक्के दिले. भारताचे शेवटचे सात फलंदाज केवळ ११ धावांमध्ये तंबूत परतले. एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त

बळी घेण्याची ओ’केफीची ही पहिलीच कामगिरी आहे. भारताकडून राहुलने एकाकी झुंज देत ६४ धावा केल्या. त्यामध्ये त्याने १० चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली.

दिवसाच्या पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कला बाद करीत रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांवर रोखला. स्टार्कने शैलीदार ६१ धावा करताना जोश हॅझलवूडच्या साथीने ५५ धावांची भागीदारी रचली.

धावफलक

  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : मॅट रेनशॉ झे. विजय गो. अश्विन ६८, डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. उमेश यादव ३८, स्टीव्ह स्मिथ झे. कोहली गो. अश्विन २७, शॉन मार्श झे. कोहली गो. जयंत यादव १६, पीटर हॅण्ड्सकोम्ब पायचीत गो. जडेजा २२, मिचेल मार्श पायचीत गो. जडेजा ४, मॅथ्यू वेड पायचीत गो. उमेश यादव ८, मिचेल स्टार्क झे. जडेजा गो. अश्विन ६१, स्टीव्ह ओ’केफी झे. साह गो. उमेश यादव ०, नॅथन लिऑन पायचीत गो. उमेश यादव ०, जोश हॅझलवूड नाबाद १, अवांतर १५ (लेगबाइज ६, नोबॉल ९), एकूण ९४.५ षटकांत सर्वबाद २६०
  • बाद क्रम : १-८२, २-११९, ३-१४९, ४-१४९, ५-१६६, ६-१९०, ७-१९६, ८-२०५, ९-२०५, १०-२६०; गोलंदाजी : इशांत शर्मा ११-०-२७-०, रविचंद्रन अश्विन ३४.५-१०-६३-३, जयंत यादव १३-१-५८-१, रवींद्र जडेजा २४-४-७४-२, उमेश यादव  १२-३-३२-४.
  • भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे.वेड गो. हॅझलवूड १०, के. एल. राहुल झे. वॉर्नर गो. ओ’केफी ६४, चेतेश्वर पुजारा झे. वेड गो. स्टार्क ६, विराट कोहली झे. स्मिथ गो. स्टार्क ०, अजिंक्य रहाणे झे. हॅण्ड्सकोम्ब गो. ओ’केफी १३, वृद्धिमान साहा झे. स्मिथ गो. ओ’केफी ०, रविचंद्रन अश्विन झे. हॅण्ड्सकोम्ब गो. लिऑन १, जयंत यादव यष्टिचीत वेड गो. ओ’केफी २, रवींद्र जडेजा झे. स्टार्क गो. ओ’केफी २, उमेश यादव झे. स्मिथ गो. ओ’केफी ४, इशांत शर्मा नाबाद २, अवांतर १ (नोबॉल १) एकूण ४०.१ षटकांत सर्व बाद १०५
  • बाद क्रम : १-२६, २-४४, ३-४४, ४-९४, ५-९५, ६-९५, ७-९५, ८-९८, ९-१०१, १०-१०५
  • गोलंदाजी : मिचेल स्टार्क ९-२-३८-२, स्टीव्ह ओ’केफी १३.१-२-३५-६, जोश हॅझलवूड ७-३-११-१, नॅथन लिऑन ११-२-२१-१
  • ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. अश्विन १०, शॉन मार्श पायचीत गो. अश्विन ०, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ५९, पीटर हॅण्डसकोम्ब झे. विजय गो. अश्विन १९, मॅट रेनशॉ झे. शर्मा गो. जयंत यादव ३१, मिचेल मार्श खेळत आहे २१, अवांतर ३ (लेगबाइज ३), एकूण ४६ षटकांत ४ बाद १४३
  • बाद क्रम : १-१०, २-२३, ३-६१, ४-११३.
  • गोलंदाजी : रविचंद्रन अश्विन १६-३-६८-३, रवींद्र जडेजा १७-६-२६-०, उमेश यादव ५-०-१३-०, जयंत यादव ५-०-२७-१, इशांत शर्मा ३-०-६-०