ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना आज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंतच्या पूर्णपणे वर्चस्व गाजवणारा भारतीय संघ ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी भारताने एकदिवसीय मालिकेतही ४-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीतही भारताची कामगिरी अव्वल दर्जाची झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या संघाला दौरा संपत आला असतानाही अजूनही सूर गवसलेला दिसत नाही; पण भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. ते कोणत्याही क्षणी धक्का देऊ शकतात, हे भारताने समजून घ्यायला हवे.

पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताच्या गोलंदाजांचा मारा अचूक आणि भेदक होता. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या दोन्ही युवा गोलंदाजांनी सुरेख मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून दूर लोटले होते. फलंदाजीमध्येही भारताने चांगली कामगिरी केली होती. रोहित शर्माने संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली होती. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत भारतीय संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहेत. त्यांनी जर हाच फॉर्म कायम ठेवला तर त्यांना मालिका विजय मिळवता येणे कठीण नसेल.

ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्हन स्मिथकडून डेव्हिड वॉर्नरकडे आले असले तरी पराभव त्यांचा पिच्छा सोडत नसल्याचेच दिसत आहे. गेल्या सामन्यात अ‍ॅरोन िफचचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नव्हती. त्यांच्या गोलंदाजांकडूनही लौकिकाला साजेशी कामगिरी पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या मालिकेतील आव्हान कायम ठेवणे कठीण समजले जात आहे.

१० – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १४ ट्वेन्टी-२० लढतींत भारताने १० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. २८ सप्टेंबर २०१२ पासून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा एकही ट्वेन्टी-२० सामना गमावलेला नाही.

१६ – कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या युवा फिरकी जोडीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपली निवड सार्थ ठरवली आहे. या दोघांनी एकदिवसीय मालिका आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये एकूण १६ बळी मिळवले आहेत.

मॅक्सवेल लवकरच फॉर्मात येईल – फिंच

आतापर्यंत भारताच्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज  फलंदाज ग्लेन मॅक्सवेल धावांचा दुष्काळ अनुभवतो आहे, पण तो लवकरच फॉर्मात येईल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अ‍ॅरोन फिंचने व्यक्त केला आहे. आतापर्यंत मॅक्सवेलने एकदिवसीय मालिकेत अनुक्रमे ३९, १४, ५ अशा धावा केल्या आहेत, तर पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत मॅक्सवेलला १७ धावा करता आल्या होत्या.

‘‘मॅक्सवेल हा एक आक्रमक फलंदाज आहे. सरावामध्ये त्याच्याकडून चांगले फटके पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तो लवकरच फॉर्मात येईल,’’ असे फिंच म्हणाला.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांडय़ा, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशीष नेहरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
  • ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेसन बेहरेन्डॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, नॅथन कोल्टर-नाइल, पॅट कमिन्स, अ‍ॅरोन िफच, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झम्पा, अँड्र्य़ू टाय.
  • सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.