पहिल्या वन-डेतील अपयशानंतर भारतीय संघाचा कर्णधार आणि धमाकेदार फलंदाज विराट कोहलीनं ईडन गार्डनच्या मैदानात दमदार खेळी केली. कारकिर्दीतील ३१ व्या शतकाच्या जवळ असताना कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित झाला. या सामन्यात रिकी पॉन्टिंगच्या पुढे जाण्याची त्याची संधी केवळ ८ धावांनी हुकली. यावेळी तो ९२ धावांवर खेळत होता. आतापर्यंतच्या कारकीर्दीत नव्वदीच्या घरात असताना विराट सहाव्यांदा बाद झाला आहे. शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकर कारकिर्दीत तब्बल १८ वेळा नव्वदीच्या घरात बाद झाला आहे. कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना २३ डावात ५ शतकं आणि ५ अर्धशतकांसह १०९२ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९६ सामन्यात कोहलीनं आतापर्यंत ५५.६३ च्या सरासरीनं ८६८९ धावा केल्या आहेत. यात ३० शतकं आणि ४५ अर्धशतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन-डेत कोहली खातेही खोलू शकला नव्हता. पहिल्या सामन्यातही कुल्टर नाईलच्या गोलंदाजीवरच तो बाद झाला होता. मॅक्सवेलनं त्याचा अप्रतिम झेल घेतला होता. मॅक्सवेलच्या या झेलची चांगलीच चर्चा झाली. पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाला २१ षटकात १६४ धावांचे लक्ष्य देण्यात आल्या. मात्र ऑस्ट्रेलियाला २१ षटकात १३७ धावांपर्यंत मजल मारता आली. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने हा पहिला सामना २६ धावांनी जिंकला होता. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसरा सामना जिंकावा लागेल.