भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली गेल्या वर्षभरात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या चार कसोटी मालिकांमध्ये त्याने सलग चार द्विशतके ठोकण्याचाही पराक्रम केला. २०१६ या वर्षात सर्वाधिक धावा ठोकण्याचाही विक्रम कोहलीने आपल्या नावावर केला होता. संघाचा कर्णधार जेव्हा चांगल्या फॉर्मात असतो तेव्हा संघातील प्रत्येक खेळाडू खेळपट्टीवर आत्मविश्वासाने खेळताना दिसतो. कोहलीने गेल्या वर्षभरातील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघाने मोठे विजय प्राप्त करून दिले आहेत. कोहली मैदानात दाखल झाला आणि लक्षवेधी कामगिरी करून माघारी परतला नाही, असं गेल्या काही वर्षात पाहायला मिळालेले नाही.
मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुण्यातील कसोटीत विराट कोहली अगदी पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला. गेल्या तीन वर्षात कोहलीने शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. कोहली बाद झाल्यानंतर भारताचा संपूर्ण संघ त्यापाठोपाठ घसरला आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव १०५ धावांत संपुष्टात आणला. तब्बल १०४ इनिंग्सनंतर कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. याआधी २०१४ साली कोहली एका वनडे सामन्यात शून्यावर बाद झाला होता.

 

पुण्यात सुरू असलेल्या कसोटीत कोहली जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीने विनाकारण बॅट बाहेर काढून ऑफ साईडल खेळणाचा प्रयत्न केला. मात्र, कोहलीचा हा प्रयत्न अपयशी ठरला. चेंडूने कोहलीच्या बटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक हँड्सकोमकरवी झेलबाद केले.