भारताचा ३३३ धावांनी धुव्वा; केफीचे पुन्हा सहा बळी; स्मिथचे शतक, ऑस्ट्रेलियाची कसोटी मालिकेत विजयाने बोहनी

वेगवान खेळपट्टय़ांवर घडलेल्या विदेशी संघांना भारतात आमंत्रित करायचे. फिरकीचा आखाडा बनवायचा. त्यांना आपल्या महान म्हणवणाऱ्या फिरकीपटूंच्या तालावर नाचवायचे. अपराजित मालिकेची मर्दुमकी गाजवायची. पण शेरास सव्वा शेर मिळतातच, हे विराट कोहलीच्या नेतृत्वाखील कसोटी संघ पूर्णपणे विसरला. व्यावसायिकतेने भरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्याच दिवशी भारतीय संघाचे पुण्यात पानिपत करत त्यांचे पितळ उघडे पाडले. सलग १९ कसोटी सामने अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचे अखेर गर्वहरण झाल्याचे गंहुजे स्डेडियममध्ये पाहायला मिळाले. वातावरण, खेळपट्टी, चाहत्यांचा पाठिंबा या कोणत्याही गोष्टींचा विपरीत परिणाम ऑस्ट्रेलियाच्या संघावर झाला नाही आणि तिसऱ्याच दिवशी त्यांनी भारतावर तब्बल ३३३ धावांनी विजय मिळवला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने शानदार शतकासह ऑस्ट्रेलियाच्या विजयाची पायाभरणी केली. पाठोपाठ स्टीव्ह ओ’केफी व नाथन लिऑन यांनी प्रभावी मारा करीत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा कळस चढविला. बेजबाबदार व नकारात्मक दृष्टीने खेळत भारताने त्यांच्यापुढे सपशेल लोटांगण घातले.

गहुंजे येथील खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांपुढे कसे खेळावयाचे याचा गृहपाठ आपण केला आहे, हेच स्मिथ व त्याच्या सहकाऱ्यांनी दाखविले. त्यांनी दुसऱ्या डावात २८५ धावा करीत भारतापुढे विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान ठेवले. याउलट आत्मविश्वासाचा अभाव दाखवत व निष्काळजीपणे फटके मारून भारताने पराभव ओढवून घेतला. भारताचा दुसरा डाव केवळ १२५ मिनिटांमध्ये ३३.५ षटकांत १०७ धावांमध्ये कोसळला. पहिल्या डावात सहा बळी घेणाऱ्या ओ’केफीने या डावातही सहा बळी मिळवीत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सामनावीराचे पारितोषिक त्यालाच मिळाले. लिऑनने चार बळी घेत त्याला चांगली साथ दिली. भारताविरुद्ध सलग सात सामने गमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पराभवाची मालिका खंडित केली. या मैदानावर २०१३ मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाने विजय मिळविला होता.

ऑस्ट्रेलियाच्या ओ’केफी व लिऑन यांनी खेळपट्टीचा कल्पकतेने उपयोग करीत भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपिट उडविली. त्यांच्या गोलंदाजीवर टप्पा व दिशा न ओळखताच खेळण्याचे तंत्र भारतीय फलंदाजांना महागात पडले. कर्णधार विराट कोहली हा ज्या प्रकारे त्रिफळाबाद झाला, ते पाहता भारताने ऑस्ट्रेलियाच्या फिरकीचा अभ्यासच केला नव्हता हे दिसून आले. भारताचे निम्मे फलंदाज पायचीत झाले तर दोन फलंदाज त्रिफळाबाद झाले. हा त्याचाच आणखी एक नमुना होता. चेतेश्वर पुजारा (३१) व अजिंक्य रहाणे (१८) यांनी काही अंशी खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही ऑस्ट्रेलियाच्या फिरकीचा अंदाज आला नाही.

सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात आणखी किती धावांची भर घालणार हेच औत्सुक्य होते. स्मिथ याने भारतीय मैदानावर स्वत:चे पहिले शतक टोलविताना फिरकी गोलंदाजांवर कशी आत्मविश्वासाने फटकेबाजी करायची हे दाखवून दिले. त्याने २५५ मिनिटांमध्ये ११ चौकारांसह १०९ धावा करीत कसोटी कारकीर्दीतील १८ वे शतक नोंदविले. भारताविरुद्ध त्याचे हे सलग पाचवे शतक आहे. मिचेल स्टार्क याने पहिल्या डावाप्रमाणेच चौकार व षटकारांची आतषबाजी करीत ३६ धावांची भर घातली.

निष्काळजीपणामुळेच पराभव – विराट कोहली

‘ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केली, मात्र त्यांच्या षटकांत सकारात्मक दृष्टीने न खेळता आमच्या फलंदाजांनी निष्काळजीपणे फटके मारले. त्यामुळेच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात स्मिथ याला दिलेली चार पाच जीवदाने महागात पडली. पराभवाचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे,’ असे  भारताचा कर्णधार कोहली म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, ‘पहिल्या डावात आम्ही ऑस्ट्रेलियन धावसंख्येइतकी किंवा त्या जवळपास धावा केल्या असत्या तर दुसऱ्या डावात खेळणे सोपे झाले असते. दुर्दैवाने आम्ही पहिल्या डावातही बेजबाबदार फटके मारून विकेट्स गमावल्या. आम्ही या डावात केवळ ११ धावांमध्ये सात विकेट्स गमावल्या. दोन्ही डावांत मोठी भागीदारी झाली नाही. आमच्या गोलंदाजांनी दिशा व टप्पा ठेवला होता, मात्र त्यांना अपेक्षेइतके यश मिळाले नाही.’

‘ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आमच्या फलंदाजांचा व गोलंदाजांचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. त्या तुलनेत आम्हाला त्यांचा अंदाज घेता आला नाही. बऱ्याच सामन्यांनंतर आम्हाला पराभव स्वीकारावा लागला आहे, याचा अर्थ आमचे खेळाडू कमकुवत आहेत असे मी मानणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मालिकेतील उर्वरित सामने जिंकून आम्ही मालिकेतही विजय मिळवू, असे कोहली म्हणाला.

अनपेक्षित विजय – स्टीव्ह स्मिथ

भारतीय मैदानावर भारताविरुद्ध एवढा मोठा विजय मिळेल अशी मी अपेक्षा केली नव्हती. मात्र माझ्या सहकाऱ्यांच्या कामगिरीवर माझा विश्वास होता, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने सांगितले.

‘पहिल्या डावात मॅट रेनशॉ व मिचेल स्टार्क यांनी केलेली फलंदाजी, त्याच्यापाठोपाठ स्टीव्ह ओ’केफी व नाथन लिऑन यांनी दोन्ही डावात केलेली प्रभावी गोलंदाजी यामुळेच आम्हाला विजयाचे स्वप्न साकारता आले. हा विजय आमच्या सांघिक कामगिरीचा आहे. फलंदाजीत चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्सुक होतो. जीवदाने लाभणे हा खेळाचा एक भाग असतो. अर्थात भारतीय मैदानावर माझे हे पहिलेच शतक असल्यामुळे मला आनंद झाला आहे. या शतकाचा संघाच्या विजयात हिस्सा होता ही आणखीनच समाधानाची गोष्ट आहे,’ असे स्मिथ म्हणाला.

धावफलक

  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २६०.
  • भारत (पहिला डाव) : १०५.
  • ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव): (४ बाद १४३ धावसंख्येवरून ) स्टीव्ह स्मिथ पायचीत गो. जडेजा १०९, मिचेल मार्श झे. साहा गो. जडेजा ३१, मॅथ्यू वेड झे. साहा गो. उमेश यादव २०, मिचेल स्टार्क झे.राहुल गो. अश्विन ३०, स्टीव्ह ओ’केफी झे.साहा गो. जडेजा ६, नॅथन लिऑन पायचीत गो. उमेश यादव १३, जोश हॅझलवुड नाबाद २, अवांतर १४ (बाईज ४, लेगबाईज ९, नोबाल १) एकूण ८७ षटकांत सर्वबाद २८५.
  • बाद क्रम- ५-१६९, ६-२०४, ७-२४६, ८-२५८, ९-२७९, १०-२८५.
  • गोलंदाजी-रविचंद्रन अश्विन २८-३-११९-४, रवींद्र जडेजा ३३-६-६५-३, उमेश यादव १३-१-३९-२, जयंत यादव १०-१-४३-१, इशांत शर्मा ३-०-६-०.
  • भारत दुसरा डाव- मुरली विजय पायचीत गो. ओ’केफी २, के.एल.राहुल पायचीत गो. लिऑन १०, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. ओ’केफी ३१, विराट कोहली त्रि.गो. ओ’केफी १३, अजिंक्य रहाणे झे.लिऑन गो. ओ’केफी १८, रविचंद्रन अश्विन पायचीत गो. ओ’केफी ८, वृद्धिमान साहा पायचीत गो. ओ’केफी ५, रवींद्र जडेजा त्रि.गो. लिऑन ३, जयंत यादव झे. वेड गो. लिऑन ५, इशांत शर्मा झे.वॉर्नर गो. लिऑन ०, उमेश यादव नाबाद ०, अवांतर १२ (बाईज ८, लेबाईज ४) एकूण ३३.५ षटकांत सर्वबाद १०७
  • बाद क्रम- १-१०, २-१६, ३-४७, ४-७७, ५-८९, ६-९९, ७-१००, ८-१०२, ९-१०२, १०-१०७ .
  • गोलंदाजी- मिचेल स्टार्क २-२-०-०, नॅथन लिऑन १४.५-२-५३-४ स्टीव्ह ओ’केफी १५-४-३५-६, जोश हॅझलवुड २-०-७-०.