ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून संघ आणि ओ’कीफेवर स्तुतिसुमनांचा वर्षांव

भारतीय भूमीवर तब्बल १३ वर्षांनंतर प्रथमच कसोटी सामना जिंकण्याची किमया साधणाऱ्या स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघावर त्यांच्या देशातील प्रसारमाध्यमांनी स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे. स्मिथच्या संघाने भारताचा डाव उलटवला. या संघात मालिका जिंकण्याचीसुद्धा क्षमता आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने फक्त अडीच दिवसांत ३३३ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. डावखुरा फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओ’कीफेच्या गोलंदाजीचेही ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी मुक्त कंठाने कौतुक केले.

‘‘इतिहास घडला. जवळपास १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला. स्टीव्ह ओ’कीफेने आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले. ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीमुळे भारतीय संघ हादरला आहे,’’ असे ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्रात म्हटले आहे.

‘‘हा क्षण येईल असे अब्जावधीहून अधिक लोकसंख्येच्या देशात वाटले नव्हते. दोन कोटींहून अधिक लोकसंख्येच्या ऑस्ट्रेलियातही तशीच धारणा होती. स्टीव्ह स्मिथच्या संघाविषयी तशा माफक अपेक्षाच करण्यात येत होत्या. मात्र त्यांनी सर्वोत्तम अशी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला त्यांच्या चक्रव्यूहात अडकवले,’’ असे या वृत्तात पुढे म्हटले आहे.

२००४ नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात कसोटी जिंकण्याचा पराक्रम दाखवला. याचप्रमाणे भारताची सलग १९ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची मालिका खंडित केली. ‘सन हेराल्ड’ वृत्तपत्राने ओ’कीफेची जादूई फिरकी आणि स्मिथची कणखर फलंदाजी यांचे गुणगान गायले आहे.

‘‘स्टीव्ह ओ’कीफेच्या कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने आपल्या क्रिकेट इतिहासातील एका सर्वोत्तम विजयाची नोंद केली. याचप्रमाणे यजमान भारताचा तीन दिवसांत मानहानीकारक पराभव केला,’’ असे त्यांनी म्हटले आहे.

‘‘काही दिवसांपूर्वी भारतात कसोटी विजयाचे आव्हान अतिशय कठीण असल्याचे भासत होते. मात्र आता बंगळुरूत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ आत्मविश्वासाने प्रस्थान करीत आहे. १९६९ नंतर प्रथमच भारतीय भूमीवरील कसोटी विजय साद घालतो आहे,’’ असे या वृत्तात म्हटले आहे.

‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’ने म्हटले आहे की, ‘‘२००४ नंतर ऑस्ट्रेलियाने भारतात मिळवलेल्या कसोटी विजयाचे श्रेय काही अन्य घटकांनासुद्धा द्यावे लागेल. फलंदाजी आणि गोलंदाजीप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण हे भारतापेक्षा सरस ठरले. पंच पुनर्आढावा प्रक्रिया म्हणजेच डीआरएसचा योग्य वापर, ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडली. विराट कोहलीच्या संघाने अनेक डीआरएस चुकीच्या वेळी वापरून वाया घालवले.’’

‘‘भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर मुरली विजय आणि लोकेश राहुल आपल्याबाबत केलेल्या पायचीतच्या अपिलाबाबत असमाधानी होते, तेव्हा त्यांनी डीआरएस प्रक्रियेद्वारे दाद मागितली. फक्त ५.३ षटकांत भारताने आपल्या दोन्ही डीआरएस संधी गमावल्या,’’ असे पुढे म्हटले आहे.

‘संडे टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ओ’कीफेचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘‘माफक अपेक्षा असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने क्रिकेटमधील सर्वात अशक्यप्राय बालेकिल्ला सर केला. येत्या काही दिवसांतील मोठय़ा अनपेक्षित विजयाची ही चाहूल आहे. ओ’कीफेने कमाल केली.’’

 

एक पराभव म्हणजे मालिका गमावली नव्हे -सचिन

नवी दिल्ली : एक पराभव म्हणजे मालिका गमावली असे नव्हे, अशा शब्दांत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारताच्या मानहानीकारक पराभवावर अलगद फुंकर घातली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिल्या कसोटीतील पराभव मागे टाकत कामगिरी उंचावेल, अशी पाठराखण सचिनने केली आहे.

नवी दिल्ली मॅरेथॉनसाठी आलेल्या सचिनने म्हटले की, ‘‘भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पुढील सामनेसुद्धा रंगतदार असतील मात्र तो खेळाचा अविभाज्य भाग असतो. पहिल्या कसोटीतील पराभवाचा अर्थ मालिका गमावली असा होत नाही. भारतीय संघ मालिकेत आत्मविश्वासाने पुनरागमन करील.’’

‘‘भारतीय संघ धर्याने पुढील सामन्यांमध्ये खेळेल. आयुष्यात अनेक चांगले क्षण असतात, तसेच कठीण क्षणही असतात. मात्र कठीण कालखंडानंतर पुन्हा स्वत:च्या पायांवर उभे राहून कसे सामोरे जाता, हे महत्त्वाचे असते. त्यामुळेच खेळात रंजकता आहे. खेळाडूची जिद्द आहे,’’ असे सचिनने या वेळी सांगितले.