रमणदीप, चिंगलेनसाना यांचे प्रत्येकी दोन गोल; युरोप दौऱ्याची यशस्वी सांगता

रमणदीप सिंग आणि चिंगलेनसाना सिंग कांगूजॅम यांच्या दुहेरी गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाने रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रियाचा ४-३ असा पाडाव केला आणि युरोप दौऱ्याची यशस्वी सांगता केली.

रमणदीप (२५व्या मिनिटाला आणि ३२व्या) आणि चिंगलेनसाना (३७व्या आणि ६०व्या) यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदवून भारताच्या विजयाचा अध्याय लिहिला. भारताने युरोप दौऱ्यावर तीन विजय मिळवले आणि दोन पराभव पत्करले. ऑस्ट्रियाकडून ऑलिव्हर बिंडर (१४व्या), मायकेल कॉर्पर (५३व्या) आणि पॅट्रिक शिमिट (५५व्या) यांनी गोल साकारले.

जागतिक हॉकी क्रमवारीत चौथ्या स्थानावरील नेदरलँड्सविरुद्ध दोन सलग विजय मिळवल्यानंतर भारताने ऑस्ट्रियाविरुद्ध सावधपणे सुरुवात केली. मात्र या सामन्यात भारताकडेच चेंडूवरील वर्चस्व अधिक प्रमाणात होते.

बिंडरने १४व्या मिनिटाला गोल करीत पहिल्या सत्रात ऑस्ट्रियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र दुसऱ्या सत्रात २५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे भारताने सोने केले. अमित रोहिदासने दिलेल्या पासवर रमणदीपने गोल साकारण्यात कोणतीही चूक न केल्यामुळे भारताला बरोबरी साधता आली.

त्यानंतर १० मिनिटांच्या विश्रांतीनंतर भारताने झोकात पुनरागमन करताना जोरदार आक्रमण केले. ३२व्या मिनिटाला रमणदीपने अप्रतिम मैदानी गोल केला. त्यामुळे भारताला २-१ अशी आघाडी मिळाली. मग मनदीप सिंगला पेनल्टी कॉर्नरद्वारे झेल साकारण्याची संधी मिळाली, परंतु चेंडू क्रॉसबारला आदळल्यामुळे ती वाया गेली. मनदीपने ३७व्या मिनिटाला आणखी एकदा संधी निर्माण केली. या वेळी मात्र उपकर्णधार चिंगलेनसानाने गोल झळकावला.

अखेरच्या सत्राला सामोरे जाताना भारताकडे ३-१ अशी समाधानकारक आघाडी होती. परंतु ऑस्ट्रियाला ते अमान्य होते. ५३व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर कॉर्परने गोल केला. पुढच्याच मिनिटाला भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र आघाडीवीर गुरजंत सिंग आणि मनप्रीत सिंग यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात आले नाही. सामना संपायला आठ मिनिटे शिल्लक असताना आघाडीवीर ललित उपाध्यायला गोल करण्याची नामी संधी चालून आली होती, परंतु ऑस्ट्रियाच्या गोलरक्षकाने हा प्रयत्न हाणून पाडला.

मग शिमिटने ५५व्या मिनिटाला गोल करीत आघाडीवरील भारताला ३-३ अशा बरोबरीत आणले. त्यामुळे सामन्यामधील रंगत अखेरच्या मिनिटांमध्ये तीव्रतेने वाढली. सामना संपण्यास १० सेकंद शिल्लक असताना चिंगलेनसानाने लक्षवेधी गोल साकारला आणि सामन्याचे पारडे भारताकडे झुकवण्याची किमया साधली. गुरंजतने दिलेल्या क्रॉसवर चिंगलेनसानाने हा महत्त्वाचा गोल केला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघ शुक्रवारी मायदेशी परतणार आहे.