अहमदाबादची पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी ज्या आकस्मिकपणे नंतरच्या दोन्ही कसोटी जिंकून वरचष्मा गाजवला, त्या पार्श्वभूमीवर आज नागपूरात सुरू झालेली चौथी आणि शेवटची कसोटी जिंकण्याचा भारताने विडा उचलला असल्याचे चित्र त्याच्या सकाळच्या सुरूवातीच्या खेळावरून दिसत आहे. 
नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या इंग्लंड संघाच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या अॅलिस्टर कुक व निक कॉम्प्टन या सलामीच्या जोडीला पाचव्या षटकातच धक्का बसला. कॉम्प्टनच्या ३ धावा झाल्या असताना इशांत शर्माच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने त्याचा झेल टिपला. एका बाजूने खंबीरपणे किल्ला लढवण्याचा कर्णधार अॅलिस्टर कुक याचा बेत उधळून लावत इशांत शर्माने त्याला अवघ्या एक धावसंख्येवर पायचित बाद केले. उपाहारापर्यंत इंग्लंड संघाने २ बाद ६१ धावा केल्या होत्या.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या ९७ षटकांत १९९ धावा झाल्या होत्या. रूट ३१ धावांवर, तर प्रॉयर ३४ धावांवर खेळत होता.
मालिकेत २-१ ने पिछाडीवर असताना इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत विजय मिळवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. दरम्यान, संघातील खेळाडूंमधील वाद उफाळून आल्याने टीम इंडियाच्या सांघिक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे नागपुरात विजय मिळवून मालिकेत २-२ ने बरोबरी करण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न असेल. 

धावफलक : इंग्लंड पहिला डाव- अॅलिस्टर कुक पायचित इशांत शर्मा १, निक कॉम्प्टन झे. धोनी गो. इशांत शर्मा ३, जोनाथन ट्रॉट त्रिफळा जडेजा ४४, इयान बेल झे. कोहली गो. चावला १, केव्हिन पीटरसन झे. ओझा गो. जडेजा ७३, रूट खेळत आहे ३१, प्रॉयर खेळत आहे ३४, अवांतर १२ (५ बाईज, ७ लेगबाईज), एकूण ९७ षटकांत ५ गडी बाद १९९ धावा.
गोलंदाजी : इशांत शर्मा १९-७-३२-२, प्रग्यान ओझा २७-९-५०-०, रवींद्र जडेजा २५-१३-३४-२, पीयूष चावला १३-१-३९-१, आर. अश्विन १३-२-३२-०.
गडी बाद होण्याचा क्रम : १-३, २-१६, ३-१०२, ४-११९, ५- १३९.

प्रतिस्पर्धी संघ :
भारत :  महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, पीयूष चावला, इशांत शर्मा, प्रग्यान ओझा, अजिंक्य रहाणे, अशोक दिंडा, मुरली विजय, परविंदर अवाना.

इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), जेम्स अँडरसन, टिम ब्रेस्नन, निक कॉम्प्टन, समित पटेल, केव्हिन पीटरसन, मॅट प्रायर, जोनाथन ट्रॉट, स्टुअर्ट ब्रॉड, जो रूट, जॉन बेअरस्टो, ग्रॅहम ओनियन्स, इऑन मॉर्गन, मॉन्टी पनेसार आणि स्टुअर्ट फिन.