तिसरा एकदिवसीय सामना आज ईडन गार्डन्सवर

इंग्लंडच्या भूमीवर होणारी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पध्रेला सामोरे जाताना इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या मालिकेत मिळवलेले निभ्रेळ यश हे आत्मविश्वास उंचावणारे असणार आहे. याच हेतूने ईडन गार्डन्स स्टेडियमवर रविवारी तिसरा आणि अखेरचा सामना जिंकण्याचा निर्धार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केला आहे.

भारतीय भूमीवर गेले काही महिने इंग्लंडच्या संघाने विजयाची चव चाखलेलीच नाही. कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकासुद्धा त्यांनी गमावलेली आहे. त्यामुळे किमान शेवट गोड करण्याचा त्यांचा इरादा असेल. मागील सामन्यात एकंदर ७४७ धावांचा पाऊस पडला होता. त्यामुळे या सामन्यात काय चित्र पाहायला मिळेल, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या पस्तिशीतल्या वीरांनी पराक्रम गाजवला. या मालिकेआधी कर्णधारपद सोडणाऱ्या धोनीने आपल्या फलंदाजीची जादू दाखवली. अखेरच्या षटकापर्यंत नाटय़मय ठरलेला हा सामना भारताने १५ धावांनी जिंकण्याची किमया साधली.

ईऑन मॉर्गनचा इंग्लिश संघ पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला. पुण्यात इंग्लंडला ३५१ धावांच्या आव्हानाचे रक्षण करता आले नाही, तर कटकमध्ये ३८२ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. दुसऱ्या सामन्यात युवराज आणि धोनीने २५६ धावांची भागीदारी रचली होती. ती भागीदारीसुद्धा मॉर्गनच्या प्रतिहल्ल्याने झाकोळली गेली. त्याने ८१ चेंडूंत १०२ धावा केल्या होत्या.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अधिक कणखर झाल्याचे दिसून येत आहे. पाठलाग करताना विराट मैदानावर असतो, तेव्हा साडेतीनशे धावांचे लक्ष्यसुद्धा खुजे वाटायला लागते, हे त्याचे वैशिष्टय़ सर्वानाच ज्ञात आहे. केदार जाधवचा फॉर्म ही भारताच्या यशाची आणखी एक गुरुकिल्ली आहे. पुण्यात त्याने साकारलेली ७६ चेंडूंत १२० धावांची खेळी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.

शिखर धवन धावांसाठी झगडतो आहे, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे १ आणि ११ धावा केल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात धवनच्या ऐवजी अजिंक्य रहाणेचा विचार झाल्यास कुणालाच आश्चर्य वाटणार नाही. शुक्रवारी दुखापतीमुळे धवनला तातडीने इस्पितळात न्यावे लागले होते. ही वस्तुस्थिती पाहता रहाणेला खेळवण्याची शक्यता बळावते आहे.

कसोटी क्रिकेटमधील आपला फॉर्म एकदिवसीय क्रिकेटमध्येसुद्धा परावर्तित करण्यात लोकेश राहुल अपयशी ठरला आहे. त्याच्यासुद्धा खात्यावर मागील दोन सामन्यांत अनुक्रमे ८ आणि ५ धावा जमा आहेत. भारताचा भरवशाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीतून सावरतो आहे. याच ऐतिहासिक मैदानावर दोन वर्षांपूर्वी त्याने विश्वविक्रमी २६४ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळेच भारताने त्या वेळी श्रीलंकेविरुद्ध ५ बाद ४०४ धावांचा डोंगर उभारला होता. आघाडीची फळी वगळता भारताची उर्वरित फलंदाजी ही जबाबदारीने खेळत आहे.

कटक येथे मॉर्गनने हार्दिक पंडय़ाच्या गोलंदाजीवर तुफानी हल्ला चढवला होता. या सामन्यात त्याला बळी मिळवता आला नव्हता. मात्र उमेश यादवऐवजी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या भुवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकांत नियंत्रित गोलंदाजी करीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पंडय़ा आणि जसप्रीत बुमराहकडून भारताला सातत्याची अपेक्षा आहे.

इंग्लंडसाठी बेन स्टोक्सचे योगदान मोलाचे ठरले होते. आदिल रशीदऐवजी संघात समावेश करण्यात आलेला लिआम प्लंकेट महागडा ठरला होता. त्याने प्रति षटक ९.१० धावा दिल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडने गोलंदाजाची फळी योग्य रीतीने जुळवण्याची गरज आहे. मॉर्गनचा बचावात्मक पवित्रा कटकमध्ये दिसून आला होता.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, उमेश यादव, अमित मिश्रा.
  • इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जो रूट, जोस बटलर (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, लियाम प्लंकेट, जॅक बॉल, सॅम बिलिंग्ज, लियाम डॉसन, जॉनी बेअरस्टो, आदिल रशीद.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० पासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.