कसोटी मालिकेत भारताने लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजयांची नोंद केली होती, पण त्यानंतर सलग तीनही सामने इंग्लंडने जिंकत मालिका खिशात टाकली होती. आता एकदिवसीय मालिकेत भारताने विजयाने प्रारंभ केला आहे. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्याने आता मालिकेतील तीन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे कसोटी मालिकेची पुम्नरावृत्ती एकदिवसीय मालिकेत होऊ नये, अशीच इच्छा भारतीय चाहत्यांची असेल. तिसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताना विजयात सातत्य राखण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी इंग्लंडचा संघ आसुसलेला असेल. या सामन्यात विजय मिळाल्यास भारतीय संघ ही मालिका गमावणार नाही, हे निश्चित होऊ शकेल.
रोहित शर्माची दुखापत ही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण दुसऱ्या सामन्यात भारताचे दोन फलंदाज १९ धावांवर बाद झाल्यावर रोहितने अजिंक्य रहाणेच्या साथीने शतकी भागीदारी रचली होती. रोहितने दमदार अर्धशतक झळकावत भारताचा डोलारा सांभाळलेला होता, त्यामुळे तो नसल्याचा संघावर थोडासा परिणाम होऊ शकतो. शिखर धवन आणि विराट कोहली यांना अजूनही सूर गवसलेला नसून चुकांमधून त्यांनी काहीही बोध घेतलेला नाही. अजिंक्य चांगली फलंदाजी करत असला तरी त्याला मोठी खेळी साकारता आलेली नाही. सुरेश रैनाच्या संघात येण्याने चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या सामन्यात ७५ चेंडूंमध्ये तडफदार शतक झळकावत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा असेल. रवींद्र जडेजाला अजूनही फलंदाजीमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही. पण गोलंदाजीमध्ये त्याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या होत्या. वेगवान गोलंदाजीमध्ये जास्त बदल होण्याची शक्यता दिसत नाही. आर. अश्विनलाही वगळण्याची शक्यता कमी असल्याने रोहितच्या जागी मुरली विजय संघात येईल, पण अन्य संघामध्ये बदल न होण्याचीच शक्यता आहे.
इंग्लंडच्या संघाला सामना जिंकायचा असेल तर त्यांना बरीच सुधारणा करावी लागेल. त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये बऱ्याच उणीवा दुसऱ्या सामन्यात दिसल्या होत्या. फलंदाजीमध्ये कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक, इयाॉन बेल, इऑन मॉर्गन, जो रूट यांना दुसऱ्या सामन्यात प्रभाव पाडता आला नव्हता. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये कसोटी मालिका गाजविणाऱ्या जेम्स अँडरसनलाही दुसऱ्या सामन्यात छाप पाडता आली नव्हती.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, करण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, धवल कुलकर्णी आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टिव्हन फिन, हॅरी गुर्ने, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, इऑन मॉर्गन, जो रूट, बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल आणि ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : दु. ३.०० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर.

दुखापतीमुळे रोहित बाहेर, विजयला संधी
नॉटिंगहॅम : उजव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखआपत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर रोहित शर्माला उर्वरीत तीन एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामन्याला मुकावे लागणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये रोहितने दमदार अर्धशतक झळकावले होते आणि हा सामना भारताने १३३ धावांनी जिंकला होता.