फिरकी गोलंदाजी हे भारताचे प्रमुख पांरपरिक अस्त्र. शनिवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला याच फिरकीच्या तालावर भारताने नाचवत सहा विकेट्सने सहज विजय मिळवला. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला भारतीय फिरकीचा समर्थपणे सामना करता आला नाही, पण काही उपयुक्त खेळींच्या जोरावर त्यांनी प्रथम फलंदाजी करताना २२७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माऐवजी संघात स्थान मिळालेल्या अंबाती रायुडूच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने सहा विकेट्स आणि ४२ चेंडू राखून विजय मिळवला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले. त्यापैकी आर. अश्विनने तीन बळी मिळवले आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले, पण पहिल्या काही षटकांमध्ये हा निर्णय चुकल्याचे वाटू लागले होते. कारण कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक (४४) आणि अ‍ॅलेक्स हेल्स (४२) यांनी दमदार फलंदाजी करत ८२ धावांची सलामी दिली. पण फिरकी गोलंदाजांनी सुरुवातीला इंग्लंडच्या धावांना वेसण घातली आणि त्यानंतर त्यांचे कंबरडे मोडले. एकामागून एक इंग्लंडचे फलंदाज बाद होत असताना त्यांचा डाव कोसळायला सुरुवात झाली. कामचलाऊ गोलंदाज सुरेश रैनाने हेल्सला आणि अंबाती रायुडूने कुकला बाद करत ही जोडी फोडली आणि इंग्लंडचा डाव घसरायला सुरुवात झाली. पण जोस बटलर (४२) आणि जेम्स ट्रेडवेल (३०) यांनी उपयुक्त खेळी साकारल्यामुळे इंग्लंडला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नसली तरी सलामीला आलेल्या अजिंक्य रहाणे (४५) आणि विराट कोहली (४०) यांनी संघाला सावरले, पण त्यांना अर्धशतक झळकावता आले नाही. पण संघात स्थान मिळवलेल्या रायुडूने ६ चौकारांच्या जोरावर नाबाद ६४ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या सुरेश रैनाला या सामन्यात ४२ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५० षटकांत सर्व बाद २२७ (अ‍ॅलिस्टर कुक ४४, अ‍ॅलेक्स हेल्स ४२ ; आर. अश्विन ३/३९) वि. भारत : ४३ षटकांत ४ बाद २२८. (अंबाती रायुडू नाबाद ६४, अजिंक्य रहाणे ४५; बेन स्टोक्स १/३१).
सामनावीर : आर. अश्विन.
कोहली-स्टोक्समध्ये बाचाबाची
*जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वादाचे प्रकरण अद्याप शमले नसतानाच धावांचा दुष्काळ अनुभवणारा विराट कोहली आणि गोलंदाज बेन स्टोक्स यांच्यामध्ये तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाचाबाची झाली. कोहलीने या सामन्यात दौऱ्यातील सर्वाधिक ४० धावा केल्या, पण त्याला बाद केल्यावर स्टोक्सने त्याच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आणि कोहलीनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.
धोनीचा यष्टीचीत बळींचा विश्वविक्रम
*क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सर्वाधिक यष्टीचीत करण्याचा विश्वविक्रम भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर झाला आहे. या सामन्यात धोनीने अ‍ॅलिस्टर कुक आणि जो रूट यांना यष्टीचीत करत कारकिर्दीत १३१ यष्टीचीत बळी मिळवले. यापूर्वी हा विश्वविक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता.