इंग्लंड विरुद्धचा वानखेडेवरील कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे याला दुखापतीमुळे वानखेडे कसोटीला मुकावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या तीन सामन्यांमध्ये रहाणे आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. पण चौथा कसोटी सामना वानखेडेवर असल्याने आपल्या घरच्या मैदानात रहाणे चांगला धावा वसुल करेल अशी चाहत्यांची अपेक्षा असतानाच संघाला धक्का बसला आहे. वानखेडेवर चांगली फलंदाजी करून सुर गवसण्यासाठी रहाणे गेल्या काही दिवसांपासून नेट्समध्ये कसून सराव देखील करत होता. पण सरावादरम्यान रहाणेच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याने तो उर्वरित दोन कसोटी सामने खेळू शकणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. रहाणेच्या जागी संघात युवा खेळाडू मनिष पांडे याला संधी देण्यात आली आहे.

रहाणेसोबतच गोलंदाजीतही भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी देखील दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी मुंबईकर मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकूर याचा समावेश करण्यात आला आहे. शमीच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे शमीला वानखेडे कसोटी खेळण्याची शक्यता कमी आहे, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. शमीच्या दुखापतीवर बीसीसीआय आणि वैद्यकीय पथकाचे काळजीपूर्वक लक्ष असून त्याच्या समावेशाबाबतचा निर्णय कसोटी सुरू होण्यापूर्वी घेतला जाईल, असेही बीसीसीआयने पत्रकात नमूद केले आहे.

वाचा: परफॉर्मन्स सुधारण्यासाठी रहाणेने घेतली या मुंबईकराची मदत

अजिंक्य रहाणे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असून गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या तीन सामन्यांमध्ये अजिंक्यला केवळ ६३ धावा करता आल्या होता. इंग्लंडच्या फिरकीपटूंच्या जाळ्यात रहाणे अडकताना दिसला. त्यामुळे आपल्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी रहाणेने नुकतेच आपले मुंबईकर प्रशिक्षक प्रविण अमरे यांची भेट घेऊन वांद्रा-कुर्ला संकुल येथील एमआयजीच्या मैदानात कसून सराव केला होता. अमरे यांनी रहाणेला फिरकीला सामोरे जाण्याचे धडे रहाणेला दिले. रहाणेने नेट्समध्ये भरपूर घाम गाळला, पण सरावादरम्यान दुखापत झाल्याने रहाणेला कसोटीला मुकावे लागणार आहे.

वाचा: …आणि प्रवीण अमरेंचा सल्ला अजिंक्यच्या कामी आला