भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्वाला लागली आहे. फिरकीच्या जाळ्यात भारत इंग्लंडला पकडणार की इंग्लंड भारतातल्या मालिका पराभवाचा उपवास सोडणार, याची उत्कंठा साऱ्यांनाच असेल. इंग्लंडविरुद्ध पहिलेवहिले शतक झळकावणारा आणि भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘ही मालिका निकराची होणार असली तरी हा एक नवीन अध्याय असेल’, असे मत व्यक्त केले आहे.
भारताने मायदेशात इंग्लंडला गेल्या मालिकेत ५-० असे पराभूत केले होते, हे विसरून चालणार नाही. यापूर्वी बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहेत, पण ही मालिका म्हणजे नवीन अध्याय असून या वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे सचिनने सांगितले.
तो पुढे म्हणाला की, ही मालिका चांगली आणि रंजक होईल, त्याचबरोबर अटीतटीची लढाई या मालिकेत पाहायला मिळेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना अहमदाबाद येथे रंगणार असून त्यासाठी शुक्रवारपासून सराव करणार असल्याचे सचिनने सांगितले.
संघातील बरेचसे खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहेत. शुक्रवारी अहमदाबादला जाऊन आम्ही सरावाचा प्रारंभ करणार आहोत. त्यामुळे संघातील खेळाडूंना ६-७ दिवस एकत्र सराव करता येईल, असे सचिनने एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सचिनच्या चाहत्यांना त्याला प्रश्न विचारण्याची एक पर्वणी या कार्यक्रमादरम्यान मिळाली होती. त्यामुळे या कार्यक्रमात रंजक प्रश्नांनी वातावरण हलकेफुलके झाले होते. या वेळी एका चाहत्याने ‘तू कोणत्या गोलंदाजाला घाबरतोस का’ असा प्रश्न विचारला, यावर सचिन म्हणाला की, मी कोणत्याही गोलंदाजाला घाबरत नाही, पण त्यांचा सन्मान मात्र मी नक्कीच करतो. कारण बाद होण्यासाठी फक्त एकच चेंडू पुरेसा ठरतो.
सध्या तू गोलंदाजी करताना दिसत नाहीस, अशा एका प्रश्नावर सचिन म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या २००७-०८ च्या दौऱ्यानंतर मी सातत्याने गोलंदाजी केलेली नाही. पण जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा नक्कीच मी गोलंदाजी करतो. पण सध्या संघात फार गुणवान गोलंदाज असल्याने माझ्यावर गोलंदाजी करण्याची वेळ येत नाही.