इंग्लंडविरुद्धच्या कटक एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ३८२ धावांचा डोंगर उभारला. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या जोडीने आज इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. युवराजने जवळपास सहा वर्षांनंतर एकदिवसीय शतक साजरे केले. या शतकासोबतच त्याने एकदिवसीय करिअरमधील त्याची आजवरची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी साकारली. युवराजने १५० धावा ठोकल्या. धोनीनेही इंग्लिश गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत १३४ धावा ठोकल्या. धोनी-युवी जोडीने कटक स्टेडियमवर चौफेर फटकेबाजी केली. दोघांच्या जोरदार फटकेबाजीमुळे भारताला तीनशेचा आकडा गाठता आला. दोघांच्या शानदार फटकेबाजीनंतर अखेरच्या षटकात हार्दिक पंड्यानेही मोठे फटके खेळले. अशाच एका मोठ्या फटक्यावर कटकच्या स्टेडियमवर एक अनपेक्षित प्रकार घडला. हार्दिक पंड्याने शॉर्ट लेंथ चेंडूवर स्वेअर लेगला खणखणीत षटकार लगावला. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स तेथे क्षेत्ररक्षण करत होता. त्याने उडी मारून षटकार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्टोक्स तोल जाऊन जाहिरात बोर्डला जाऊन धडकला. स्टोक्स सावरत नाही तोवर प्रेक्षकांकडे गेलेला चेंडू स्टोक्सच्या दिशेने फेकण्यात आला. तो सरळ स्टोक्सच्या तोंडावर आदळला. बेसावध असलेल्या स्टोक्सला काहीच कळले नाही आणि चेंडू लागल्याने तो चिडला. स्टोक्स प्रेक्षकांच्या दिशेने पाहून रागाच्या भरात बडबडला देखील पण चेंडू नेमका कुणी फेकला हे कळले नाही.

दरम्यान, कटक सामन्यात भारताची सुरूवात निराशाजनक झाली होती. केवळ २९ धावांवर तीन विकेट्स पडल्या होत्या. लोकेश राहुल, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यावेळी स्वस्तात बाद झाले होते. अशावेळी युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांनी चौथ्या विकेटसाठी तब्बल २५६ धावांची भागीदारी रचून संघाला ३८१ धावा ठोकून दिल्या. युवराजने आपल्या १५० धावांच्या खेळीत तब्बल २१ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर धोनीने १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकार ठोकले. धोनीने १३४ धावा केल्या.