जगज्जेतेपद जिंकण्याच्या ईष्रेने सज्ज झालेल्या भारतीय संघाची आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत शनिवारी यजमान इंग्लंडशी गाठ पडत आहे. नुकत्याच झालेल्या चौरंगी क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला ८ विकेट्स राखून नमवल्यामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे.

२००५ मध्ये उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी महिला अजिंक्यपद स्पध्रेतील पाकिस्तानविरुद्धचे तीन सामने टाळल्यामुळे विश्वचषक स्पध्रेतील थेट प्रवेशाची संधी गमावली. त्यानंतर पात्रतेचा अडसर पार करीत भारताने इथवर मजल मारली आहे.

भारतीय संघ अनुभवी मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मितालीने नुकतेच १००व्या सामन्यात देशाचे नेतृत्व केले. हा पराक्रम करणारी ती महिला क्रिकेटविश्वातील तिसरी खेळाडू ठरली होती. मागील सहा सामन्यांत सलग अर्धशतके झळकावणारी मिताली इंग्लंडमध्येही आपल्या कामगिरीतील सातत्य टिकवण्यासाठी उत्सुक आहे. उपांत्य फेरीत पोहोचणे, हे आमचे पहिले आव्हान आहे, असे मितालीने सांगितले आहे.

चौरंगी क्रिकेट स्पध्रेत दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांनी ३२० धावांची विक्रमी सलामी नोंदवली होती. महिला क्रिकेटमधील तीनशेहून अधिक धावांची ती पहिलीच ऐतिहासिक भागीदारी ठरली. भारतीय फलंदाजीची मदार प्रामुख्याने मिताली आणि दीप्तीवर असणार आहे. दुखापतीतून सावरत संघात पुन्हा स्थान मिळवणाऱ्या स्मृती मंधानामुळे भारताची ताकद वाढली आहे. राऊत, मोना मेश्राम आणि हरमनप्रीत कौर या तिघी जबाबदारी खेळून संघाला तारत आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी नावावर असणारी झुलन गोस्वामी भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळत आहे. तिला शिखा पांडेकडून तोलामोलाची साथ मिळत आहे, तर एकता बिश्त फिरकीची जबाबदारी पाहत आहे.

भारताने मागील १७ सामन्यांपैकी १६ सामने जिंकल्यामुळे त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षेने पाहिले जात आहे. मात्र दोन वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या इंग्लंडचे आव्हान खडतर असेल. योगायोगाची गोष्ट म्हणजे ही दोन्ही विजेतेपदे पटकावली होती, तेव्हा यजमानपद त्यांच्याकडेच होते.

सारा टेलरने विश्रांतीनंतर इंग्लंडच्या संघात पुनरागमन केले आहे. कर्णधार हिदर नाइट आणि कॅथरिन ब्रंट फॉर्मात आहे. इंग्लंडचा वेगवान मारासुद्धा आव्हानात्मक मानला जातो.

संघ

  • भारत : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्त, सुशमा वर्मा, मानसी जोशी, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, नूझहत परवीन.
  • इंग्लंड : हिदर नाइट (कर्णधार), जॉर्जिया एल्विस, जेन्नी गन, अ‍ॅलेक्स हार्टले, सारा टेलर, टॅमी ब्युनमाँट, कॅथरिन ब्रंट, डॅनिले हॅझेल, बेथ लँगस्टन, लॉरा मार्श, अनया श्रुबसोल, नताली शिवर, फ्रँन विल्सन, डॅनिली व्यॅट, लॉरेन विनफिल्ड.
  • सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.
  • प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.