‘चीनची भिंत’ ही एक अभेद्य तटबंदी म्हणून ओळखली जाते. कबड्डीविश्वात सामथ्र्यशाली बचावामुळे इराणच्या संघालासुद्धा हेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शनिवारी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेमकी हीच भिंत भेदून सलग तिसरा विश्वचषक आपल्याकडे राखण्याचे आव्हान भारतापुढे असणार आहे.

भारत सलग तिसऱ्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इराणशी झुंजणार आहे. २००४मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात भारताने इराणवर ५५-२७ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर २००७मध्ये झालेल्या दुसऱ्या विश्वचषकात भारताने त्यांना २९-१९ अशा फरकाने हरवले. अगदी २०१०च्या आशियाई क्रीडा स्पध्रेतसुद्धा भारताने त्यांना सहज हरवले होते. मात्र २०१४मध्ये प्रो कबड्डी लीगचे वैभवशाली पर्व सुरू झाले. खेळातील या क्रांतीमुळे कबड्डीला चांगले दिवस आले. इराणी खेळाडू प्रो कबड्डीच्या अनुभवातून अधिक तरबेज झाले. २०१४ सालीच झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला सुवर्णपदक राखणे कठीण झाले होते. राकेश कुमारच्या समर्थ अनुभवामुळे जेमतेम दोन गुणांच्या (२७-२५) फरकाने भारताने निसटता विजय मिळवला. हेच दडपण भारतावर इराणविरुद्ध लढताना असणार आहे.

इराणचा संघनायक मेराज शेख म्हणतो, ‘‘विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आम्ही भारताला शंभर टक्के हरवू. इराणच्या संघाने नेहमीच ताकदीने आपला ठसा आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उमटवला आहे. योग्य रणनीतीनुसार आम्ही खेळू. आमच्या संघात लढण्याची ऊर्जा असलेल्या युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.’’

भारताचा कर्णधार अनुप कुमार आणि प्रशिक्षक बलवान सिंग यांना भारताच्या विजेतेपदाची खात्री आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. प्रो कबड्डीत नियमित खेळल्यामुळे मेराज, फझल अत्राचाली, आदी खेळाडूंचा खेळ आम्ही उत्तम जाणतो, असे अनुपने या वेळी सांगितले.

प्रो कबड्डीच्या आकडेवारीनुसार इराणचा बचाव भारतासाठी आव्हानात्मक

  • प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामात फझल अत्राचालीला सर्वोत्तम बचावपटूचा बहुमान मिळाला होता, त्याचे हे यश प्रामुख्याने भारतीय चढाईपटूंसमोर मिळवलेले आहे. विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या २२ चढायांपैकी १० वेळा पकडी त्याने केल्या आहेत. आकडेवारीत मांडायचे तर हे प्रमाण ५४ टक्के आहे.
  • फझलचे हे यश अनुप कुमार (७५ टक्के), अजय ठाकूर (१०० टक्के), दीपक हुडा (६६.६७ टक्के) आणि राहुल चौधरी (४२.८६ टक्के) यांच्या चढायांबाबत मिळवलेले आहे. म्हणजेच भारताचा विश्वचषकातील सर्वात भरवशाचा चढाईपटू अजय इराणच्या बचावापुढे अपयशीच ठरला आहे. अनुपची आकडेवारीसुद्धा समाधानकारक नाही
  • मेराज शेखच्या बचावाची प्रदीप नरवालच्या चढायांविरुद्ध कामगिरी ६६.६७ टक्के इतकी समाधानकारक आहे.
  • मोहित चिल्लर हा भारताचा सर्वोत्तम बचावपटू मानला जातो. मात्र मेराजच्या चढायांपुढे त्याचा पुरेसा निभाव लागलेला नाही. मेराजची पकड करण्याच्या प्रयत्नात ६६.६७ टक्के प्रमाणात मोहितला अपयश आले आहे.

अंतिम सामना

  • वेळ : रात्री ८ वा.पासून
  • भारत वि. इराण.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.