अध्यक्षीय संघाविरुद्ध आज दुसरा सामना

अध्यक्षीय संघाविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. न्यूझीलंडसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. त्यामुळे अध्यक्षीय संघाविरुद्धच्या दुसरा सामना ही न्यूझीलंडसाठी अस्तित्वाची लढाई असेल. या सामन्यात न्यूझीलंडला थेट भारताशी दोन हात करायचे आहेत. त्यामुळे या सामन्यात त्यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला तर भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्यांचे मनोबल खचलेले असेल, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना सर्वात महत्त्वाचा असेल.

पहिल्या सराव सामन्यात अध्यक्षीय संघाकडून पृथ्वी शॉ, लोकेश राहुल आणि करुण नायर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये शाहबाझ नदीमने तिखट मारा करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना हतबल केले होते. त्यामुळे दुसऱ्या सराव सामन्यात या खेळाडूंकडून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. त्याचबरोबर कर्णधार श्रेयस अय्यरवर साऱ्यांच्या नजरा असतील.

न्यूझीलंडला पहिल्या सराव सामन्यात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनी गेल्या सामन्यात बऱ्यापैकी फलंदाजी केली होती. पण मार्टिन गप्तिल, रॉस टेलर आणि कॉलिन मुर्नो यांना सपशेल अपयश आले होते. टेलर आणि मुर्नो यांना मोठे फटके मारणेही जमत नव्हते. त्याचबरोबर न्यूझीलंडला गप्तिलकडूनही फार मोठय़ा अपेक्षा आहेत. या सामन्यात तो या अपेक्षांची पूर्ती करतो का, हे संघासाठी महत्त्वाचे असेल. गेल्या सामन्यात ट्रेंट बोल्टने अध्यक्षीय संघाच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता, पण या सामन्यात त्याला सुयोग्य साथ देण्याची जबाबदारी टीम साऊथीवर असेल.

संघ

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, मार्टिन गप्तिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अ‍ॅडम मिल्ने, कॉलिन मुर्नो, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टीम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वॉर्कर.

अध्यक्षीय संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), करुण नायर, गुरकिरत मान, पृथ्वी शॉ, शिवम चौधरी, मिलिंद कुमार, शाहबाझ नदीम, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अव्हेश खान.