कोहली, अश्विन, शमी यांच्यावर लक्ष

आयपीएलचा मोसम संपला. आता काही दिवसांमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार असून त्यापूर्वी काही सराव सामने खेळण्याची संधी सर्वच संघांना मिळणार आहे. रविवारी भारताचा पहिला सराव सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार असून या सामन्यात कर्णधार विराट कोहली, फिरकीपटू आर. अश्विन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या कामगिरीवर साऱ्यांची नजर असणार आहे.

आयपीएलमध्ये कोहलीची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नव्हती. या लीगमध्ये त्याला फक्त ३०८ धावाच करता आल्या होत्या. दुखापतीमुळे अश्विन आयपीएलमधील एकही सामना खेळू शकला नव्हती. शमी आयपीएलमध्ये खेळला असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याच कालावधीनंतर तो पुनरागमन करणार आहे. भारतीय संघ जानेवारी महिन्यात इंग्लंडविरुद्ध मायदेशात एकदवसीय मालिका खेळला होता. त्यानंतर गेल्या चार महिन्यांमध्ये भारतीय संघ एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. पण सध्याचे खेळाडू हे व्यावसायिक असून या गोष्टीचा मोठा परिणाम त्यांच्यावर होणार नाही. युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी हे संघातील अनुभवी खेळाडू असून त्यांची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे असेल. मुंबई इंडियन्सने यंदाचे जेतेपद पटकावले असले तरी रोहित शर्माला सूर गवसलेला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे तो शिखर धवनसह कशी सलामी देतो, हे पाहावे लागेल. अजिंक्य रहाणे आणि केदार जाधव यांच्या कामगिरीवरही साऱ्यांची नजर असेल. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, अश्विन, शमी, उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर भारताची मदार असेल.

न्यूझीलंडच्या संघाचा विचार केला तर त्यांची गोलंदाजी ही फलंदाजीपेक्षा उजवी दिसत आहे. फलंदाजीमध्ये कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गप्तील यांच्याकडे चांगला अनुभव आहे. त्यामुळे संघातील युवा फलंदाजांची या वेळी परीक्षा असेल. मिचेल मॅक्लेघन, टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट हे वेगवान गोलंदाजीचे त्रिकुट सध्याच्या घडीला चांगलेच फॉर्मात आहे. कोणत्याही फलंदाजाला रोखण्यासाठी या तिघांचा भेदक मारा उपयुक्त ठरू शकतो. त्याचबरोबर कोरे अँडरसनसारखा गुणी अष्टपैलूही त्यांच्याकडे आहे. मिचेल सँडनर आणि जीतन पटेल हे फिरकीपटू यांचा मारा किती प्रभावी ठरतो, हे न्यूझीलंडसाठी महत्त्वाचे असेल.

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), युवराज सिंग, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंडय़ा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह.
  • न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, मार्टिन गप्तील, रॉस टेलर, ल्यूक राँची (यष्टीरक्षक), नील ब्रुम, जिमी नीशाम, कॉलिन डे ग्रँडहोम, कोरे अँडरसन, मिचेल सँटनर, जीतन पटेल, अ‍ॅडम मिल्ने, मिचेल मॅक्लेघन, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट.

युवराज पहिल्या सराव सामन्याला मुकणार

  • तापामुळे भारताचा वरिष्ठ फलंदाज युवराज सिंग न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्याला मुकणार आहे. ‘‘युवराज सिंगला ताप आला असून त्याच्या प्रकृतीत हळुहळू सुधारणा होत आहे, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वैद्यकिय चमूने कळविले आहे. त्यामुळे चिंतेची बाब नाही,’’ असे बीसीसीआयने निवेदनात नमूद केले आहे. त्यात पुढे असे नमूद केले आहे की,‘‘त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे आणि त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात त्याला खेळता येणार नाही. वैद्यकिय चमू त्याची देखरेख करत असून तो लवकरच बरा होईल, अशी आशा आहे.’’