न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सोमवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. मुंबईकर श्रेयस अय्यर आणि हैदराबादचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या दोघांना संघात स्थान मिळाले आहे. तर आशिष नेहराची पहिल्या टी-२० सामन्यासाठीच निवड करण्यात आली असून हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना ठरेल.

राष्ट्रीय निवड समितीची सोमवारी बैठक पार पडली असून या बैठकीत न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली. या मालिकेत तीन टी- २० सामने होणार आहेत. या मालिकेत विराट कोहलीला विश्रांती मिळणार अशी चर्चा होती. मात्र या मालिकेत विराट कोहलीकडेच कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आल्याने तो या मालिकेत खेळणार हे स्पष्ट झाले. मुंबईकर क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले आहे. श्रेयस अय्यरने प्रथम श्रेणी, वन-डे आणि टी-२० सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला आहे, असे सांगत निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी श्रेयसच्या निवडीचे समर्थन केले.

भारत- न्यूझीलंड यांच्यात १ नोव्हेंबररोजी दिल्लीत, ४ नोव्हेंबररोजी राजकोटमध्ये, ७ नोव्हेंबररोजी थिरुवनंतपूरमला असे तीन टी-२० सामने होणार आहेत.

टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उप कर्णधार), लोकेश राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आशिष नेहरा (फक्त पहिल्या टी-२० सामन्यासाठी)

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघाची निवड करण्यात आली आहे. तीन पैकी दोन सामन्यांसाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला.

श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे:
विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा</p>