भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये आज तिसरा एकदिवसीय सामना

असातत्यपूर्ण फलंदाजी आणि मोठे फटके लगावण्याच्या नादात विकेट फेकल्यामुळे फिरोझशाह कोटला मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीमध्ये भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारताने जर फलंदाजीवर अधिक मेहनत घेतली तर त्यांना हा सामना जिंकता येऊ शकतो. दुसरीकडे न्यूझीलंडचा गेल्या सामन्यात मिळवलेला दौऱ्यातील हा पहिला विजय होता. त्यामुळे या विजयाने त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. गोलंदाजी हे त्यांचे बलस्थान असले तरी त्यांच्या फलंदजांना अजूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जर त्यांच्या अनुभवी खेळाडूंनी अपेक्षेनुरूप खेळ केला तर त्यांना भारतावर दुसरा विजय मिळवता येईल. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची दोन्ही संघांना संधी असेल.

तिसऱ्या सामन्यापासून भारतीय संघात काही बदल केले आहेत. त्याचा फलंदाजीवर कोणताही परिणाम होणार नसला तरी गोलंदाजीवर नक्कीच होऊ शकतो. फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव आणि हार्दिक पंडय़ा यांच्याकडून मोठी खेळी पाहायला मिळालेली नाही. गेल्या सामन्यात केदार, धोनी आणि पंडय़ा यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला होता, पण त्यांना संघाला सामना जिंकून देता आला नव्हता. विराट कोहलीने पहिल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली असली तरी त्याला दुसऱ्या सामन्यात जास्त धावा करता आल्या नव्हता. गोलंदाजीमध्ये उमेश यादव, अमित मिश्रा आणि अक्षर पटेल यांच्या कामगिरीत सुधारणा होणे गरजेचे आहे. या सामन्यात धवल कुलकर्णीला संधी मिळण्याची शक्यता असून त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतील.

न्यूझीलंडकडून या दौऱ्यात कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनी दमदार फलंदाजी केली आहे. पण रॉस टेलर, मार्टनि गप्तीलसारख्या अनुभवी खेळाडूंना अजूनही आपली फलंदाजीमध्ये छाप पाडता आलेली नाही. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी हे वेगवान गोलंदाज सातत्याने अचूक मारा करताना दिसत आहेत. त्याचबरोबर फिरकीपटू मिटेल सँटनरही चांगली फिरकी गोलंदाजी करत आहे.

विजय असो किंवा पराभव तो विसरून नव्याने पुढच्या सामन्याच्या सरावासाठी तयार व्हायचे असते. त्यामुळे या सामन्यासाठी आम्ही सराव करताना कोणतेही दडपण घेत नाही. परिस्थितीनुरूप खेळामध्ये बदल करावा लागतो आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत. संघाचे मनोबल उंचावलेले आहे आणि या गोष्टीचा आम्हाला आगामी सामन्यांसाठी फायदा होईल. टीम साऊदी, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज

प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या आहेत. ते तंत्राबद्दल जास्त बोलत नाहीत, तर फलंदाजांच्या मानसिकतेबद्दल सांगतात. त्यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला चांगला फायदा होत आहे. त्याचबरोबर तळाच्या फलंदाजांनाही ते मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे सध्याच्या घडीला आम्हाला त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच आहे. अमित मिश्रा, भारताचा फिरकीपटू

 

संघ

  • भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, अमित मिश्रा, अक्षर पटेल, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मनदीप सिंग.
  • न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, मार्टनि गप्तील, रॉस टेलर ल्यूक राँची (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, इश सोधी, जिमी नीशाम, कोरे अँडरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, अँटॉन डेव्हकिच, डग ब्रेसवेल, मॅट हेन्री, बीजे
  • वेळदुपारी १.३० वा.पासून.
  • थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर.