पत्त्याचा बंगला उभारण्यासाठी चांगला पाया रचावा, पण कळस रचताना काही चुकांमुळे बंगला पूर्णपणे कोसळावा, असेच काहीसे भारतीय संघाच्या बाबतीतही घडले. एकदिवसीय मालिकेत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ पुन्हा जिंकता जिंकता हरला. सलामीवीर शिखर धवनचे दमदार शतक, त्याला विराट कोहलीची मिळालेली सुयोग्य साथ पाहता भारत संघ न्यूझीलंडच्या भूमीवरील यशोशिखराचे स्वप्न साकारेल, असे वाटत होते. पण अवसानघातकी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये विजय काही पदरी पाडून घेता आला नाही आणि विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. धवनच्या दमदार शतकाचा फायदा मधल्या फळीतील फलंदाजांना घेता न आल्याने त्याचे शतक व्यर्थ ठरले, तर नील वॉगनरसह न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे मधल्या फळीतील भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. ४०७ धावांचा पाठलाग करताना भारताला ३६६ धावा करता आल्या आणि ४० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सामन्यात द्विशतक झळकावणारा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलम याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
दिवसाच्या पाचव्याच षटकात टिम साऊदीने चेतेश्वर पुजाराला (२३) बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. भारतीय संघ आता ढेपाळणार असे वाटत असताना धवन आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी रचत संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले. आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणारा भारतीय संघ विजयाचे स्वप्न पाहत होता. पण वॉगनरने या दोघांचाही काटा काढत न्यूझीलंडला दुहेरी यश मिळवून दिले. आतापर्यंत दौऱ्यात भकास कामगिरी करणाऱ्या धवनने १२ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ११५ धावांची जबरदस्त खेळी साकारली, तर कोहलीने १२ चौकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. हे दोघेही बाद झाल्यावर काही वेळात न्यूझीलंडने नवीन चेंडू घेतला आणि त्यापुढे भारताच्या विजयाचे स्वप्न बेचिराख झाले.
१ बाद २२२ वरून २७० धावांपर्यंत भारताला चार फलंदाज गमवावे लागले आणि इथेच सामना हातातून निसटायला सुरुवात झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने (३९) सामना फिरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये तो अपयशी ठरला. ‘सर’ रवींद्र जडेजा (२६) यांच्याकडे कसोटी सामना खेळण्याची मानसिकता आहे का, याचा प्रश्न या वेळी साऱ्यांनाच पडला. वॉगनरने भेदक मारा करत चार बळी मिळवले आणि त्याला अन्य वेगवान गोलंदाजांकडून चांगली साथ मिळाली.
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) :  ५०३.
भारत (पहिला डाव) :  २०२.
न्यूझीलंड (दुसरा डाव) :  १०५
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. वॉटलिंग गो. साऊदी १३, शिखर धवन  झे. वॉटलिंग गो. वॉगनर ११५, चेतेश्वर पुजारा झे. वॉटलिंग गो. साऊदी २३, विराट कोहली  झे. वॉटलिंग गो. वॉगनर ६७, रोहित शर्मा  झे. वॉटलिंग गो. साऊदी १९, अजिंक्य रहाणे पायचीत गो. बोल्ट १८, महेंद्रसिंग धोनी त्रि. गो. वॉगनर ३९, रवींद्र जडेजा झे. सोधी गो. बोल्ट २६, झहीर खान झे. टेलर गो. वॉगनर १७, इशांत शर्मा झे. वॉटलिंग गो. बोल्ट ४, मोहम्मह शमी नाबाद ०, अवांतर (बाइज १२, लेग बाइज ७, नोबॉल ४, वाइड २) २५, एकूण ९६.३ षटकांत सर्व बाद ३६६.
बाद क्रम : १-३६, २-९६, ३-२२२, ४-२४८, ५-२६८, ६-२७०, ७-३२४, ८-३४९, ९-३६२, १०-३६६.
गोलंदाजी : बोल्ट २३.३-२-८६-३, साऊदी २३-४-८१-३, वॉगनर २५-८-६२-४, अँडरसन ७-१-२२-०, सोधी १५-२-७८-०, विल्यम्सन ३-०-१८-०.
निकाल : न्यूझीलंड ४० धावांनी विजयी.
सामनावीर : ब्रेन्डन मॅक्क्युलम.

बायर्न म्युनिकची आगेकूच
बर्लिन : बुंडेसलिगा फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी असलेल्या बायर्न म्युनिक संघाने न्युरेमबर्गवर २-० अशी मात करत विजयी आगेकूच केली. अन्य लढतीत बोरुसिया डॉर्टमंडने ब्रेमेनचा ५-१ असा धुव्वा उडवला. या विजयासह बायर्न म्युनिक संघाने या स्पर्धेत ४५ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे. पराभवामुळे न्युरेमबर्गची गुणतालिकेत तळाच्या तीन संघांत रवानगी झाली आहे. सामन्यात ६० टक्के काळ चेंडूवर नियंत्रण राखत म्युनिकने वर्चस्व गाजवले. मारिओ मंडुझुकिकने बायर्नसाठी सलामीचा गोल केला. मध्यंतरानंतर लगेचच मारिओच्या पासवर कर्णधार फिलीप ल्हामने शानदार गोल केला.

चेल्सीचा न्यू कॅस्टलवर विजय
लंडन : ईडन हॅझार्डच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर चेल्सीने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत न्यू कॅस्टलवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. बेल्जियमच्या आघाडीपटूने नेत्रदीपक खेळ करत सात मिनिटांत दोन गोल केले. पुढच्या सत्रात हंगामातील १४व्या गोलची नोंद करत हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयासह चेल्सीने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविले आहे. गुणतालिकेत आठव्या स्थानी असलेल्या न्यूकॅस्टलसाठी हा आणखी एक दारुण पराभव ठरला. अन्य लढतींमध्ये  वेस्ट हॅमने अ‍ॅस्टान व्हिलाचा २-० असे नमवले. वेस्ट हॅमतर्फे केव्हिन नोलनने दोन गोल केले.

नीलने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याला बळी मिळाले नाही, तर त्याने ते मिळवले. टिम आणि ट्रेंट यांनीही त्याला चांगली साथ दिली. फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेऊन आम्हाला चांगली फलंदाजी करता आली नाही, पण गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे आम्हाला विजय मिळवता आला.
– ब्रेन्डन मॅक्क्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार.

माझ्या मनात आता संमिश्र भावना आहेत. नवीन चेंडू घेतल्यावर षटकात आम्ही दोन फलंदाज गमावले. आम्ही पराभूत झालो असलो तरी या सामन्यातून आम्हाला बरेच काही शिकण्यासारखे आहे. या अनुभवाचा फायदा आम्हाला भविष्यात नक्कीच होईल. धवनने चांगली खेळी साकारली, त्याचा फॉर्म कायम राहील, अशी अपेक्षा आहे.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार.