धोनीच्या घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध आज चौथा एकदिवसीय सामना

घरच्या मैदानात मालिका विजयाचा मानाचा तुरा शिरपेचात खोवण्याची सुवर्णसंधी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला असेल. आतापर्यंत तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना बुधवारी रांचीला म्हणजेच धोनीच्या घरच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास त्यांना मालिकेत विजयी आघाडी मिळता येईल, पण दुसरीकडे न्यूझीलंडसाठी मालिकेतील आव्हान कायम राखण्याची ही अखेरची संधी असेल. कारण हा सामना गमावल्यावर त्यांना मालिका जिंकता येणार नाही. त्यामुळे हा सामना चांगलाच चुरशीचा होईल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.

मोहालीमध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि धोनी यांच्या नेत्रदीपक फलंदाजीच्या जोरावर भारताने सात विकेट्स राखून सहज विजय मिळवला होता. या सामन्यामध्ये बऱ्याच दिवसांनी धोनीकडून चांगली खेळी पाहायला मिळाली होती. चौथ्या क्रमांकावर बढती घेत फलंदाजीला आल्यावर त्याच्यामध्ये पूर्वीचा धोनी पाहायला मिळाला होता. कोहली हा भन्नाट फॉर्मात आहे. प्रतिस्पर्धी कुणीही असो, मैदान कुठलेही असो, कोहलीकडून धावांचा पाऊस प्रत्येकवेळी अनुभवायला मिळतो आहे. पण या दोघांचा अपवाद वगळल्यास एकाही फलंदाजाला छाप पाडता आलेली नाही. अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा यांना मालिकेत चांगली फलंदाजी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमरा हा सातत्याने भेदक मारा करत आहे. पण अन्य गोलंदाजांना अजूनही अचूक कामगिरी करता आलेली नाही.

न्यूझीलंडची गोलंदाजी हे बलस्थान आहे. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊथी या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत भारताच्या फलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली आहे. डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरही सातत्याने फिरकीच्या तालावर भारतीय फलंदाजांना चकवत आहे. पण फलंदाजीमध्ये न्यूझीलंड मागे पडताना दिसत आहे. मार्टिन गप्तील आणि रॉस टेलर यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गेल्या सामन्यात टेलरने कोहलीला झेल सोडून जीवदान दिले होते आणि तेच न्यूझीलंडला महाग पडले होते. अष्टपैलू कोरे अँडरसनला अजून सूर गवसलेला दिसत नाही. पण कर्णधार केन विल्यमसन आणि टॉम लॅथम या दोघांनाच सातत्याने चांगली फलंदाजी करता आली आहे. त्यामुळे जर न्यूझीलंडला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या गप्तील आणि टेलरसारख्या अनुभवी खेळाडूंना जबाबदारी चोख पार पाडावी लागेल.

संघ

  • भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, अमित मिश्रा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, धवल कुलकर्णी, जयंत यादव, मनदीप सिंग.
  • न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, मार्टनि गप्तील, रॉस टेलर ल्यूक राँची (यष्टिरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोधी, जिमी नीशाम, कोरे अँडरसन, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, अँटॉन डेव्हकिच, डग ब्रेसवेल, मॅट हेन्री, बीजे वॉिल्टग.

एकेरी-दुहेरी धावांनी चांगली खेळी साकारता येत असते. मोहालीतील सामन्यामध्ये मी आणि कोहलीने या गोष्टीवरच भर दिला. गेल्या सामन्यात आम्ही चांगला विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात आम्हाला मालिका विजयाची संधी आहे, पण या गोष्टीचे दडपण मात्र आमच्यावर नाही. कारण आमच्यासाठी प्रत्येक सामना हा नवीन असतो आणि तो जिंकण्यासाठीच आम्ही मैदानात उतरतो.

महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार