क्रिकेटचा ज्वर ओसरला.. भारत-पाकिस्तान सामन्यात आता पूर्वीसारखी मजा नाही.. अशा चर्चा विश्वचषकापूर्वी रंगल्या होत्या.. मात्र यंदाच्या विश्वचषकातील बहुचर्चित अशा भारत-पाकिस्तान लढतीने प्रेक्षकसंख्येचे सर्व विक्रम मोडीत काढत ‘टीआरपी’ बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल २८ कोटी, ८० लाख चाहत्यांनी भारत-पाकिस्तान लढतीचा आनंद टेलिव्हिजनवर घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
१५ फेब्रुवारीला अ‍ॅडलेडमध्ये झालेल्या या मुकाबल्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दमदार विजय साकारला. २०११च्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीनंतर म्हणजेच चार वर्षांच्या कालावधीनंतर इतकी प्रचंड प्रेक्षकसंख्या लाभलेला हा एकमेव कार्यक्रम ठरला.
पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील या लढतीला स्टार समूहावरील वाहिन्यांवर १४.८ तर डीडी वाहिनीवर २.९ रेटिंग मिळाले आहे. विश्वचषकासाठी स्टार समूहाने खास कल्पक संकल्पना राबवली. भारतीय संघाच्या सामन्यांना समोर ठेवून तयार करण्यात आलेल्या मौका जाहिराती टेलिव्हिजनसह नेटविश्वात मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय झाल्या आहेत. या जाहिरातींना १७ दशलक्ष एवढी विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळाली आहे.
भारत-पाकिस्तान लढतीचे आकर्षण वाढावे या हेतूने बॉलीवूडचा बादशाह अमिताभ बच्चन यांना समालोचन कक्षात पाचारण केले. आपल्या दमदार आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या अमिताभ यांनी सामन्यापूर्वी विश्लेषण तसेच धावते वर्णन करीत या सामन्याची रंगत वाढवली. अमिताभ यांच्यासह भारताचे माजी कर्णधार कपिलदेव, शोएब अख्तर, राहुल द्रविड, संजय मांजरेकर
यांनी या सामन्याचे समालोचन केले होते.
‘‘एकदिवसीय विश्वचषक ही क्रिकेट विश्वातली सर्वोच्च स्पर्धा आहे. भारतीय चाहत्यांनी आपल्या संघाला प्रत्यक्ष आणि टेलिव्हिजनवर भरभरून पाठिंबा दिला आहे. देशातील प्रमुख प्रक्षेपण कंपनी असल्याने, क्रिकेट चाहत्यांना सामन्याची इत्थंभूत माहिती मिळावी हा प्रयत्न होता.
हा प्रयत्न विक्रमी प्रेक्षकसंख्येचे गमक आहे,’’ असे ‘स्टार इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर यांनी सांगितले.