पदकाच्या शर्यतीतून बाद झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला जागतिक हॉकी लीगमध्ये (उपांत्य फेरीचा टप्पा) पुन्हा एकदा पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत दुबळ्या मलेशियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताला पाचव्या ते आठव्या स्थानासाठीच्या लढतीसाठी खेळावे लागणार आहे.

जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या भारताला आठ स्थानांनी पिछाडीवर असलेल्या मलेशियाने २-३ असे पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. गेल्या दोन महिन्यांत मलेशियाविरुद्ध भारताने दुसऱ्यांदा पराभव स्वीकारला. या स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून भारत बाद झाला असला तरी जागतिक हॉकी लीगच्या अंतिम टप्प्यात आणि पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेत यजमान म्हणून त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

साखळीतील पहिल्या तीन सामन्यांमधील विजयांनंतर भारताची गाडी विजयपथावरून घसरली आणि त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत त्यांना चुका सुधारून पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी आहे. याआधी साखळी लढतीत भारताने ७-१ अशा फरकाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठी पाकिस्तानचा संघही उत्सुक आहे.

  • वेळ : सायं. ४.१५ वा.पासून
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २.