भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये भारतातील दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमधील क्रिकेट मालिकेला लगाम लागला होता. पण राजकारणी आणि क्रिकेट प्रशासकांच्या मनामध्ये उभय देशांमध्ये क्रिकेटची मालिका व्हावी, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये दोन्ही देशांमध्ये मालिका खेळवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील क्रिकेट मंडळांच्या अध्यक्षांनी यासाठी पुढाकार घेतला असून दोन्ही देशांतील शासनालाही हे मान्य असल्याचे समजते. पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी याबाबत माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती.
भारत सरकारचेही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने व्हावेत, असेच मत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जेटली यांनी या वेळी दोन्ही क्रिकेट मंडळांनी एकत्र येऊन याबाबत सखोल चर्चा करावी, त्याचबरोबर सर्व गोष्टींची मांडणी करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे सांगतले होते. त्यानुसार सध्या दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी, असा करार या दोन्ही देशांमध्ये यापूर्वीच झाला आहे. ही मालिका भारतामध्ये व्हावी आणि पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात यावा, अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची इच्छा आहे. पण शहरयार खान यांनी या मालिकेसाठी संयुक्त अरब अमिरातीचा प्रस्ताव ठेवला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये ही मालिका खेळवता येणार नाही, हे दोन्ही मंडळांनी मान्य केले आहे. ही मालिका भारतात व्हावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. दुसरीकडे ही मालिका दोन्ही देशांमध्ये न खेळवता त्रयस्थ ठिकाणी म्हणजे अमिरातीमध्ये खेळवावी, असे पीसीबीने म्हटले आहे.

या मालिकेबाबत अजून काही गोष्टींवर चर्चा करणे बाकी आहे. या मालिकेसाठी काही योग्य पावले उचलली गेली आहेत. दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये याबाबत सखोल चर्चा सुरू आहे. ही मालिका भारत किंवा त्रयस्थ ठिकाणी होणार असून पाकिस्तानमध्ये होणार नाही, याबाबत दोन्ही मंडळांचे एकमत झाले आहे. या वर्षांच्या अखेरीस म्हणजे डिसेंबरमध्ये ही मालिका खेळवण्याचा विचार सुरू आहे.
अनुराग ठाकूर, बीसीसीआय सचिव

प्रक्षेपण हक्क अडथळा नाही – शहरयार खान
भारत-पाकिस्तान मालिकेदरम्यान प्रक्षेपण हक्क हा अडथळ्याचा मुद्दा असणार नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरियार खान यांनी स्पष्ट केले. ‘‘संयुक्त अरब अमिरातीमधील सामन्यांच्या प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्ट्स वाहिनीकडे आहेत. टेन स्पोर्ट्स एस्सेल समूहाचा भाग आहे. याच समूहाने इंडियन प्रीमिअर लीगला समांतर लीग स्पर्धा सुरू करण्यासंदर्भात पावले उचलली आहेत. यामुळे या समूहावर बीसीसीआयची खप्पा मर्जी आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान मालिकेसाठी दोन्ही संघटना हा प्रश्न मार्गी लावतील,’’ अशी आशा शहरियार यांनी व्यक्त केली. बीसीसीआय आणि प्रक्षेपण कंपन्या यांच्यातील वाद लवकरच सुटेल आणि ही मालिका होईल असे त्यांनी पुढे सांगितले.