अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

एकामागून एक दमदार विजय मिळवत भारताच्या महिला संघाने विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भारतापुढे आव्हान असेल ते दक्षिण आफ्रिकेचे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत स्थान मिळवत विश्वचषक स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज या देशांनी यापूर्वीच विश्वचषक स्पर्धेतील स्थान पक्के केले होते. बांगलादेश आणि आर्यलड या दोन्ही संघांनी पात्रता फेरीत चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना यापुढेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार आहे. उपांत्य फेरीत भारताने पाकिस्तानवर सात विकेट्स राखून विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत डकवर्थ-लुईस नियमांनुसार आर्यलडवर ३६ धावांनी मात केली होती.

या स्पर्धेत भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिलेला आहे, तर दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर मात केली होती, पण त्यानंतर मुख्य स्पर्धेत भारताने आफ्रिकेला पराभूत केले होते. त्यामुळे या स्पर्धेचा अंतिम सामना चांगलाच चुरशीचा होईल, असे चाहत्यांना वाटत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा भारताची कर्णधार मितीली राजच्या नावावर आहेत. गोलंदाजीमध्ये शिखा पांडे आणि एकता बिश्त यांनी चमकदार कामगिरी केली आहे.