दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अश्वमेध रोखण्यासाठी सज्ज
भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकीर्दीतील कठीण कालखंडातून जात आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित विजय मिळवून न देऊ शकल्यामुळे टीकेचा भडिमार त्याच्यावर होत आहे. भारत दौऱ्यावर अपराजित राहिलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ इंदूरच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या पाश्र्वभूमीवर धोनीची कारकीर्द आणि नशीब पालटेल, अशी आशा क्रिकेटरसिकांना आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अद्याप विजयाची चव चाखलेली नाही. ट्वेन्टी-२० मालिकेत भारताची पाटी कोरी राहिली. (तिसरा सामना रद्द झाला.) त्यानंतर पहिल्या रोमहर्षक एकदिवसीय सामन्यात भारताने पाच धावांनी हार पत्करली. त्यामुळे टीकेच्या लक्ष्यस्थानी असलेल्या धोनीला आता भारताचे आव्हान टिकवावे लागणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. एकंदर २०१५ हे वर्ष भारतासाठी फारसे अनुकूल ठरलेले नाही.

आयपीएलच्या अंतिम फेरीत धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतसुद्धा भारत पराभूत झाला होता. नेतृत्वाची एकीकडे कसोटी चालू असताना धोनीच्या फलंदाजीच्या फॉर्मलाही ग्रहण लागले आहे. गोलंदाजांवर आता धोनीच्या फलंदाजीची पूर्वीइतकी दहशत राहिलेली नाही. कानपूरच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धोनी ‘फिनिशर’ या आपल्या प्रतिमेला न्याय देऊ शकला नव्हता. अखेरच्या षटकात भारताला ११ धावांची आवश्यकता होती. धोनी हा सामना आरामात जिंकून देईल, अशी अपेक्षा होती. परंतु ‘कॅप्टन कुल’ हे बिरुद मिरवणाऱ्या धोनीने आपले मोठे फटके खेळण्याचे फलंदाजीचे कौशल्य हरवल्याचे जाणवले. ३० चेंडूंत ३१ धावांच्या खेळीत धोनीने एकमेव चौकार ठोकला.
विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सामन्याचे चित्र पालटवू शकणारा भरवशाचा फलंदाज ही धोनीची ओळख आता राहिलेली नाही. त्यामुळे एकदिवसीय मालिकेतील उर्वरित चार सामने धोनीसाठी आव्हानात्मक असतील.

भारतीय फलंदाजीची मदार प्रामुख्याने सलामीवीर रोहित शर्मावर असेल. धरमशालातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यातील शतकानंतर कानपूरला रोहितने दीडशे धावांची शानदार खेळी साकारली होती. मात्र त्याचा सलामीवीर जोडीदार शिखर धवन मात्र धावांसाठी झगडत आहे. अजिंक्य रहाणेने संघात परतल्यावर ६० धावांची खेळी उभारून आपले महत्त्व पटवून दिले आहे. आव्हानात्मक प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध हिमतीने खेळण्यात अजिंक्यची हातोटी आहे. सुरेश रैनाची कामगिरी आणि अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीचे कौशल्य यांच्याबाबत मात्र गांभीर्याने प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

फलंदाजीच्या तुलनेत गोलंदाजांची कामगिरी धोनीसाठी अधिक चिंतेची बाब आहे. कानपूरच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनला झालेली दुखापत या चिंतेत आणखी भर घालते. ए बी डी’व्हिलियर्स आणि कंपनीच्या आक्रमणापुढे भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवचा निभाव लागत नाही. पहिल्या सामन्यात डी’व्हिलियर्सने ७३ चेंडूंत १०४ धावांची धडाकेबाज खेळी साकारून दक्षिण आफ्रिकेला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला होता. या सामन्यात अखेरच्या १० षटकांत भारताने शंभरहून अधिक धावा दिल्या होत्या. आता लेग-स्पिनर अमित मिश्रा आणि अनुभवी हरभजन सिंग भारताच्या फिरकीची धुरा सांभाळतील.

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर पहिलीवहिली एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल आणि डेल स्टेन संघात परतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण धारदार झाल्याची प्रचीती कानपूरला आली आहे. युवा कॅगिसो रबाडाने ट्वेन्टी-२० मालिकेत छाप पाडल्यानंतर कानपूरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. लेग-स्पिनर इम्रान ताहीर हे डी’व्हिलियर्सचे महत्त्वाचे अस्त्र आहे.

स्फोटक फलंदाज डी’व्हिलियर्स दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा भार समर्थपणे सांभाळतो. उपकर्णधार फॅफ डू प्लेसिस त्याला तोलामोलाची साथ देतो. याशिवाय जीन-पॉल डय़ुमिनी, हशिम अमला, डेव्हिड मिलर, क्विंटन डी कॉक, फरहान बेहरादिन असे दर्जेदार फलंदाज दक्षिण आफ्रिकेकडे आहेत. आकडेवारीनुसार होळकर क्रिकेट स्टेडियम हे भारतासाठी नेहमीच यशस्वी ठरले आहेत. मोठय़ा धावसंख्या हे वैशिष्टय़ असलेल्या या मैदानावरील आतापर्यंतचे तिन्ही सामने भारताने जिंकलेले आहेत.

भारतीय वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत सध्या रोहित शर्मा अप्रतिम फलंदाजी करीत आहे. तो दर्जेदार खेळाडू आहे. तो सामोरे जातो, ते १० चेंडू महत्त्वाचे असतात. या १० चेंडूंत त्याला तंबूची वाट दाखवणे आवश्यक असते. एकदा का त्याने धावांची विशी ओलांडली की त्याला रोखणे कठीण आहे. त्यामुळे रोहितला रोखण्याचेच आव्हान आमच्यापुढे प्रामुख्याने आहे.
-चार्ल लँगेवेल्ट, दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजीचे प्रशिक्षक

सातत्य हा कोणत्याही संघाच्या यशाचा प्रमुख मूलमंत्र असतो. सध्या जागतिक क्रिकेट क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताला जर अव्वल स्थान काबीज करायचे असेल तर अशा प्रकारच्या छोटय़ा चुका वारंवार करता येणार नाही. अखेरच्या षटकांतील गोलंदाजी आणि फलंदाजी ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. मात्र मालिकेत आम्ही शानदार पुनरागमन करू, अशी आशा आहे.
– रोहित शर्मा, भारताचा फलंदाज

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), हरभजन सिंग, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, गुरकिराट सिंग आणि अमित मिश्रा.
दक्षिण आफ्रिका : ए बी डी’व्हिलियर्स (कर्णधार), हशिम अमला, क्विंटन डी कॉक, फॅफ डू प्लेसिस,
जीन-पॉल डय़ुमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहरादिन, ख्रिस मॉरिस, खाया झोंडो, आरोन फँगिसो, इम्रान ताहिर, डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, कायले अ‍ॅबॉट कॅगिसो रबाडा.
सामन्याची वेळ : दु. १.३० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनी.