आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) खेळपट्टी निरीक्षण प्रक्रियेंतर्गत नागपूरला झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी ‘खराब’ असल्याचे ताशेरे ओढण्यात आले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) हे ताशेरे हे मानहानीकारक आहेत.
खेळपट्टी निरीक्षण प्रक्रिया ही तिसऱ्या कलमात अंतर्भूत आहे. त्यानुसार आयसीसीचे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी आपल्या अहवालात खेळपट्टीच्या कामगिरीबाबत चिंता प्रकट केली. हा अहवाल बीसीसीआयला पाठवण्यात आला असून, त्यांना १४ दिवसांत त्याचे उत्तर द्यावे लागणार आहे.
जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या यजमानपदाखाली सामना झाला होता. या खेळपट्टीवर पहिल्या दिवशीपासूनच चेंडू मोठय़ा प्रमाणात वळू लागला, त्यामुळे तीन दिवसांत कसोटी निकाली ठरली होती. हेच मनोहर आयसीसीचे कार्याध्यक्ष पदही भूषवत असल्यामुळे या प्रकरणाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
बीसीसीआयने आपले उत्तर दाखल केल्यावर आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) जेफ अलार्डिस आणि प्रमुख सामनाधिकारी रंजन मदुगले सर्व साक्षींची छाननी करतील. यात सामन्याच्या
व्हिडीओ चित्रणाचाही समावेश असेल. त्यानुसार खेळपट्टीबाबतचा आक्षेप योग्य असल्यास दंडाची शिक्षा होऊ शकेल. त्यामुळे आयसीसीकडून सध्या तरी
कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
नागपूर कसोटी २५ ते २७ नोव्हेंबर अशा तीन दिवसांत संपली. यात भारताने अनुक्रमे २१५ आणि १७३ धावा केल्या, दक्षिण आफ्रिकेने ७९ आणि १८५ धावा केल्या. या खेळपट्टीबाबत ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, इंग्लंडचा मायकेल वॉन अशा अनेक माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहली आणि संघ संचालक रवी शास्त्री यांनी मात्र खेळपट्टीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मात्र खेळपट्टीच्या स्वरूपाबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.