भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना सहज जिंकला. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा मात्र अपयशी ठरला. श्रीलंकेने दिलेल्या माफक २१७ धावांचा पाठलाग करताना रोहित अवघ्या ४ धावा करुन तंबूत परतला. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर मैदानात उतरलेल्या रोहितने या सामन्यात स्वत:च्या पायावर कुऱ्हाडच मारुन घेतली. गडबड करण्याची कोणतीही गरज नसताना चोरटी धाव घेणे त्याला महागात पडले. विशेष म्हणजे तो क्रिजमध्ये पोहोचला मात्र बॅट हातातून निसटल्यामुळे तो मैदानात सुरक्षित पोहोचू शकला नाही. धाव काढत असताना बॅट मागे सोडून तो पुढे धावतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या धावबाद होण्यावर चांगलीच चर्चा रंगली.

एका नेटिझनने ट्विटवर लिहिलंय की, कार्यालयात वेळेत पोहचावे, पण हजेरी लावण्यासाठी स्वॅप करणं विसरावे, असा प्रकार रोहितच्या बाबतीत घडला. दुसऱ्या एका नेटिझनने रोहितच्या बेजबाबदारपणाची जोड त्याच्या शैलीदार फलंदाजीशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. ‘रोहित हा एवढा प्रतिभावंत फलंदाज आहे, की त्याने बॅटपेक्षाही स्वत: वेगवान असल्याचा आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला,’ असे त्याने लिहिलंय. रोहितच्या धावबाद होण्याची तुलना थेट ई-मेलशी केल्याचे दिसून येते. लवकरात लवकर माहिती देण्यासाठी मेल तर पाठवला, पण अॅटॅचमेंट करायलाच विसरला, असा काहीसा प्रकार रोहितच्या बाबतीत घडला, असे ट्विट एकाने केले आहे. शर्माजींचा लाडला कोणाच्या मागे नाही राहू शकत, आपल्या बॅटच्याही नाही, अशा शब्दांत देखील प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळत आहे.

रोहित श्रीलंकेविरुद्ध फारसा प्रभावी ठरलेला नाही. श्रीलंकेविरुद्ध मागील दहा डावात त्याची कामगिरी ही निराशजनक आहे. मागील दहा डावांत ४, ०, ११, ५, ५, ०, ०, ४, ४, ४ अशी निराशा त्याच्या पदरी पडली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील त्याची कामगिरी पुन्हा पाहायला मिळावी, यासाठी त्याचा चाहता उत्सुक असेल. येत्या सामन्यात तो श्रीलंकेविरुद्धच्या आलेखात सुधारणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.