वेगवान खेळपट्टीवर श्रीलंकेविरुद्धची तिसरी कसोटी आजपासून

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एक नवा इतिहास घडवण्यासाठी उत्सुक आहे. परदेशातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील ऐतिहासिक निभ्रेळ यश भारताला साद घालत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना अनुकूल पल्लीकेलेच्या खेळपट्टीवर शनिवारपासून सुरू होणारा श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

भारताने मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने मोठय़ा फरकाने जिंकले आहेत. गॉल येथील पहिल्या सामन्यात भारताने ३०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला, तर कोलंबोतील दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि ५३ धावांनी शानदार विजय साजरा केला.

गेले काही महिने श्रीलंकेचा संघ संक्रमण अवस्थेतून जात आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत हा संघ झगडतानाच दिसतो आहे. कँडीमध्ये खेळपट्टीचे स्वरूप बदलून किमान अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करावा, अशी लंकेची धारणा आहे. मात्र हे सारे हवामानावर अवलंबून आहे. पावसामुळे भारताला शुक्रवारी सराव सत्र रद्द करावे लागले.

फिरकीची हत्यारे बोथट ठरल्यानंतर आता वेगवान गोलंदाजांसह आक्रमण करण्याचे श्रीलंकेने ठरवले आहे. त्यामुळे दुष्मंता चामीरा आणि लाहिरू गॅमेज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. नूवान प्रदीप आणि रंगना हेराथ या दुखापतग्रस्त खेळाडूंची जागा ते घेतील.

खेळपट्टीचे हिरवेगार स्वरूप पाहता कोहलीला भुवनेश्वर कुमार या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला निलंबित रवींद्र जडेजाच्या जागी संघात स्थान द्यायला लागेल. कोहलीच्या नेतृत्वाच्या कारकीर्दीत कसोटी क्रिकेटमधील मिळालेल्या संधीचे भुवीने सोने केले आहे. मात्र फलंदाजीचीही क्षमता असणारा भुवनेश्वर हार्दिक पंडय़ाची जागा घेण्याची शक्यता आहे, तर ‘चायनामन’ कुलदीप यादव दुसऱ्या फिरकीपटूचे स्थान संघात घेईल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथील उसळणाऱ्या खेळपट्टीवर मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीपने लक्षवेधी कामगिरी बजावली होती. पहिल्या डावात त्याने मिळवलेले चार बळी निर्णायक ठरले होते.

कोहलीने आतापर्यंत २८ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने आपला ११ जणांचा चमू कधीच कायम ठेवलेला नाही. त्यामुळे २९व्या कसोटीतही तो कोणते बदल करील, हे उत्सुकतेचे ठरेल.

श्रीलंकेच्या संघाची सद्य:स्थिती पाहता भारताला मालिकेवर ३-० असे वर्चस्व गाजवणे कठीण जाणार नाही. १९३२ मध्ये भारताच्या कसोटी पर्वाला प्रारंभ झाला. त्यानंतर आतापर्यंतच्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने अद्याप निभ्रेळ यश मिळवलेले नाही. हा इतिहास घडल्यास मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाचीही फलश्रुती ठरू शकेल. या संघाकडे नवा इतिहास घडवण्याची क्षमता आहे, असे शास्त्री यांनी मालिकेपूर्वी ठणकावून सांगितले होते.

गतवर्षीच्या ऑक्टोबरपासून रोहित शर्मा अद्याप कसोटी पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असला तरी संघ व्यवस्थापन अभिनव मुकुंदला आणखी एक संधी देण्याची दाट शक्यता आहे.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, अक्षर पटेल.
  • श्रीलंका : दिनेश चंडिमल (कर्णधार), उपूल थरंगा, दिमुथ करुणारत्ने, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, लाहिरू थिरिमाने, धनंजय डी’सिल्व्हा, निरोशान डिक्वेला (यष्टीरक्षक), दिलरुवान परेरा, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नाडो, दुष्मंता चामीरा, लाहिरू गॅमेज, लक्षण संदाकान, मलिंदा पुष्पकुमारा.

सामन्याची वेळ : सकाळी १० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ आणि एचडी.