गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताने श्रीलंकेवर ४९८ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात भारताचे ३ गडी माघारी परतले असून, अभिनव मुकुंद आणि विराट कोहली यांना भारताला मजबूत परिस्थितीत आणून ठेवलं आहे.  पहिले दोन बळी पटापट गेल्यानंतर अभिनव मुकुंद आणि कर्णधार विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली. गुणतिलकाने अभिनव मुकुंदला पायचीत करुन तिसऱ्या दिवसाचा खेळ संपवला. मुकुंदने ८१ धावांची खेळी केली. तर सध्या कर्णधार विराट कोहली ७६ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत श्रीलंकेसमोर आणखी किती धावाचं आव्हान ठेऊन, त्यांना परत फलंदाजीचं निमंत्रण देतो हे पहावं लागणार आहे.

त्याआधी पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर तिसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात करण्यात आली.  श्रीलंकेला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात परत फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. पहिल्या डावात १९० धावांची शतकी खेळी करणारा शिखर धवन माघारी परतला. दिलरुवान पेरेराने त्याला माघारी धाडत, श्रीलंकेच्या वाटेतला एक मोठा अडसर दूर केला आहे. त्यानंतर काही मिनीटांच्या अंतराने लहिरु कुमाराने पहिल्या डावात शतक केलेल्या चेतेश्वर पुजाराला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला .

श्रीलंकेकडून दिलरुवान पेरेरा, लहिरु कुमारने आणि धनुष्का गुणतिलकाने १-१ बळी घेतला. त्यामुळे उर्वरित दिवसात श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजीला लवकर गुंडाळण्यात यशस्वी ठरतात का हे पहावं लागणार आहे.

त्याआधी गॉल कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव २९१ धावांमध्ये आटोपला . भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेचे फलंदाज फार काही तग धरु शकले नाही. त्यामुळे पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ ३०९ धावांनी मागे पडला. लंच टाईमपर्यंत श्रीलंकेचे ८ गडी माघारी परतले होते. त्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्येच जाडेजाने अखेरच्या लहीरु कुमारला बाद करत श्रीलंकेचा डाव संपुष्टात आणला. श्रीलंकेचा एक खेळाडू हा क्षेत्ररक्षणादरम्यान जायबंदी झाल्यामुळे त्याला या सामन्यात खेळता येणार नाहीये. पहिल्या डावात कोहलीने लंकेला फॉलोअॉन न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवातही झालेली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डावात भारतीय संघ काय रणनिती आजमवतो हे पहावं लागणार आहे.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात अँजलो मॅथ्यूज आणि दिलरुवान पेरेराने चांगली केली होती. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची अर्धशतकी भागीदारीही झाली. या भागीदारीने श्रीलंकेच्या संघाने २०० धावांचा टप्पाही ओलांडला. अँजलो मॅथ्यूज आपल्या शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, जाडेजाने कर्णधार विराट कोहलीच्या हाती झेल द्यायला भाग पाडत लंकेला सहावा धक्का दिला.

लागोपाठ कर्णधार रंगना हेरथलाही जाडेजाने माघारी धाडत, श्रीलंकेची अवस्था आणखीनच बिकट केली. यानंतर कसोटीत पदार्पण केलेल्या हार्दिक पांड्याने नुवान प्रदीपचा त्रिफळा उडवत श्रीलंकेला आठवा धक्का दिला. लंचटाईमपर्यंत श्रीलंकेची अवस्था २८९/८ अशी झालेली आहे, त्यामुळे श्रीलंकेचे उर्वरित फलंदाज आता भारतीय आक्रमणासमोर किती तग धरतात हे पहावं लागणार आहे. श्रीलंकेकडून दिलरुवान पेरेरा शेवटपर्यंत ९२ धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान कालच्या प्रमाणे आजही भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना फारसं स्थिरावू दिलं नाही. भारताकडून रविंद्र जाडेजाने ३ फलंदाजांना माघारी धाडलं आणि लंकेच्या शेपटाला फार वळवळ करायची संधी दिली नाही. याव्यतिरीक्त मोहम्मद शमीने २ आणि अश्विन, उमेश कुमार आणि पांड्याने १-१ बळी घेत जाडेजाला चांगली साथ दिली.

  • गुणतिलकाच्या गोलंदाजीवर मुकुंद बाद झाल्यानंतर दिवसाचा खेळ संपला, दिवसाअखेरीस भारत १८९/३
  • दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी, मुकुंद ८१ धावांची खेळी केली, कर्णधार कोहली ७६ धावांवर नाबाद
  • अभिनव मुुकुंद आणि विराट कोहलीने अर्धशतक साजरं केलं
  • कोहली आणि मुकुंदने भारताचा डाव सावरला, दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी, भारताकडे ४०० पेक्षा अधिक धावांची आघाडी
  • पावसाचा खेळ थांबला, सामन्याला सुरुवात
  • सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला
  • मात्र लहीरु कुमारने चेतेश्वरला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला
  • चेतेश्वर पुजारा आणि अभिनव मुकुंदने भाराताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, दोघांमध्ये ३७ धावांची भागीदारी
  • दुसऱ्या डावात भारताची अडखळती सुरुवात, शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का
  • लंकेला फॉलोऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय, भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात
  • लहीरु कुमारला बाद करत, जाडेजाने लंकेचा डाव संपवला. २९१ धावांमध्ये लंकेचा डाव संपुष्टात
  • जाडेजाने शेपटाला वळवळ करायची संधी दिली नाही
  • तिसऱ्या दिवशी लंच टाईमपर्यंत श्रीलंकेची धावसंख्या २८९/८
  • मात्र नुवान प्रदीपचा त्रिफळा उडवत हार्दिक पांड्याने श्रीलंकेला आठवा धक्का दिला.
  • श्रीलंकेकडून मॅथ्यूजकडून दिलरुवान पेरेराची एकाकी झुंज, ९० धावांवर पेरेरा अजुनही नाबाद
  • पाठोपाठ कर्णधार रंगना हेरथही जाडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद, श्रीलंकेला सातवा धक्का
  • जाडेजाने मॅथ्यूजला बाद करत श्रीलंकेला सहावा धक्का दिला
  • चौथ्या विकेटसाठी पेरेरा आणि मॅथ्यूजमध्ये ६२ धावांची भागीदारी, लंकेची धावसंख्या २०० पार
  • मॅथ्यूज आणि दिलरुवान पेरेराकडून तिसऱ्या दिवसाची सावध सुरुवात
  • १५४/५ धावसंख्येवरुन लंकेच्या डावाला सुरुवात