विराटच्या द्विशतकानंतर अश्विनची शतकी खेळी

विराट आणि अश्विनच्या भागिदारीच्या बळावर भारताने पहिला डाव ५६६ धावावंर घोषित केला. दिवसअखेरीस वेस्ट इंडिजचे फलंदाज उतरले असता त्यांना मैदानावर फार काळ तग धरता आला नाही. शामीने पंधराव्या षटकात चंद्रिकाला बाद करत वेस्ट इंडिज संघाला पहिला झटका दिला. दिवसअखेरीस वेस्ट इंडिज संघाचा खेळ १ बाद ३१ धावांवर थांबला.

तत्पूर्वी, र्अँटिग्वाच्या मैदानावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दितील पहिले द्विशतक झळकावले. त्यानंतर कर्णधार विराटला संयमी साथ देणाऱ्या अष्टपैलू आर.अश्विननेही कारकिर्दितील तिसरे कसोटी शतक पुर्ण केले. विराट परदेशात पहिले द्विशतक झळकावणारा तो भारताचा पहिला कर्णधारही ठरला. भारताचे फलंदाज संथ खेळपट्टीवर अडखळत खेळत असताना कोहलीने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर २०० धावांची खेळी साकारली. यावेळी आर. अश्विनने ११३ धावांची  खेळी साकारली.

सलामीवीर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा स्वस्तात बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या कोहलीने कसलीही तमा न बाळगता स्वत:च्या आक्रमक शैलीत दमदार फलंदाजी केली. सलामीवीर शिखर धवनबरोबर तिसऱ्या विकेटसाठी कोहलीने १०५ धावांची भागीदारी रचली. धवनने या वेळी भारताच्या धावसंख्येचा भक्कम पाया रचला. धवनने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८४ धावांची खेळी साकारली. कोहलीने ७५ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करीत संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्यानंतर सातत्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर प्रहार करीत कोहलीने कसोटीतील १२ वे शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यावरही कोहलीची फलंदाजी थंडावली नाही.

११९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत कोहलीने पहिल्या वहिल्या द्विशतकाला गवसणी घातली. या षटकानंतर उपहाराच्या वेळी संघाची ४ बाद ४०४ अशी मजबूत स्थिती होती. पण उपहारानंतर एकही धाव न करता कोहली बाद झाला. कोहलीने २४ चौकारांच्या जोरावर २०० धावा केल्या. यावेळी अश्विनबरोबर त्याने पाचव्या विकेटसाठी १६८ धावांची भागीदारी रचली.