पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ते भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय लढतीवर. पहिल्या लढतीत भारताने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे या लढतीतही कामगिरीत सातत्य राखण्यावर त्यांचा भर असेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या संघावर नजर फिरवली तर त्यांच्याकडे अनुभवाची उणीव जाणवते. पण वेस्ट इंडिजची ही युवा सेना भारताला धक्का देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

पहिल्या लढतीत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली होती. पण संघासाठी सध्याच्या घडीला चिंतेची बाब म्हणजे युवराज सिंगचा फॉर्म. गेल्या काही सामन्यांमध्ये युवराजला लौकिकाला साजेशी कामगिरी करत आलेली नाही. त्याचबरोबर २०१९ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाची बांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे युवराज फलंदाजीत अपयशी ठरला तर त्याच्या जागी युवा खेळाडूला स्थान दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीतही संघात या प्रकारचा विचार सुरू झाला आहे. त्यामुळे त्याच्याकडूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही, तर दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांना संघात स्थान मिळू शकेल. भविष्याचा विचार केला तर कार्तिकपेक्षा पंतला संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार हा चांगल्या फॉर्मात आहे. त्याला अन्य गोलंदाजांची कशी साथ मिळते, यावर भारताचा विजय अवलंबून असेल. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा युवा संघ भारताला कितपत झुंज देतो, हे पाहावे लागेल. कारण वेस्ट इंडिजच्या संघाची सध्याची अवस्था फारशी चांगली नाही. अफगाणिस्तानसारख्या संघानेही त्यांना नमवले होते. त्यामुळे खचलेल्या मानसिकतेतून ते कशी उभारी घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, उमेश यादव.
  • वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), जोनाथन कार्टर, मिग्युएल कमिन्स, अल्झारी जोसेफ, जेसन मोहम्मद, किरान पॉवेल, केसरिक विल्यम्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेस, शाय होप (यष्टिरक्षक), इव्हिन लेविस, अ‍ॅश्ले नर्स, रोव्हमन पॉवेल.
  • वेळ : सायंकाळी ६.३० वा. प्रक्षेपण : टेन स्पोर्ट्स वाहिनी.