सलामीवीर लोकेश राहुलचे शतक ; भारताची संथ वाटचाल; वेस्ट इंडिजचा आक्रमक मारा

लोकेश राहुलच्या १५८ धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताची धावसंख्या ५  बाद ३५८ आहे. तत्पूर्वी १ बाद १२६ वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या अनुनभवी माऱ्यासमोरही संथ पवित्रा घेतला. भारताने पहिल्या सत्रात २६ षटकांमध्ये केवळ ५९ धावा केल्या. पहिल्या कसोटीत झटपट माघारी परतलेल्या चेतेश्वर पुजाराने कासव गतीने फलंदाजी करत किल्ला लढवला.

कोणताही धोका न पत्करता खेळण्याच्या धोरणामुळे वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा स्वीकारत दडपण वाढवले. यादरम्यान राहुल आणि पुजाराला जीवदानही मिळाले. ७५ ते १०० टप्प्यासाठी राहुलने सव्वा तास खर्ची घातला. रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर षटकार खेचत राहुलने कसोटी कारकीर्दीतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. राहुलने झळकावलेली तिन्ही शतके (सिडनी, कोलंबो आणि किंग्स्टन) विदेशी भूमींवर आहेत. एकेक धावेसाठी झगडणाऱ्या पुजाराला वेस्ट इंडिजला लक्ष्य करत त्याच्या दिशेने उसळत्या चेंडूचा मारा केला. या माऱ्याने विचलित न होता पुजाराने उपाहारापर्यंत चिवट लढत दिली.

खेळीदरम्यान वीसचा टप्पा ओलांडेपर्यंत बाद होण्यासाठी कुप्रसिद्ध राहुलने शतकी खेळी साकारत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. सलामीच्या दिवशी सुमार प्रदर्शन करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी मात्र टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले.

दरम्यान सलामीच्या दिवशी गवत असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा वेस्ट इंडिजचा निर्णय सपशेल चुकला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा डाव १९६ धावांतच गुंडाळला. जरमाइन ब्लॅकवूडने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. भारतातर्फे फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने ५२ धावांत ५ बळी घेतले. पहिल्याच दिवशी फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय फलंदाजांनी दमदार वाटचाल केली होती.

 

update:

# भारतीय संघाने उपहारापर्यंत १८५ धावा केल्या आहेत.

# दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून पहिल्या सत्रात भारताने १ बाद १४१ धावा केल्या आहेत.

# मार्लन सॅम्युअल्सला अश्विनने ३७ धावांवर चालते केले आहे.

# २९ षटकाच्या खेळानंतर वेस्ट इंडिज ४ बाद १०९ धावा

# पावसानंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात.

#  उपहारानंतर सुरु झालेला खेळ थांबला आहे. २६.४ षटकानंतर वेस्ट इंडिज ४ बाद ९३ धावा

# मार्लन सॅम्युअल्स १८ तर रोस्टन चेस ० धावावर नाबाद आहेत

# उपहारानंतर खेळामध्ये पावसाचा व्यत्यय

# पहिल्या सत्रातील उपहारापर्यंत वेस्ट इंडिज २६ षटकात ४ बाद ८८ धावा.

# जरमाइन ब्लॅकवूड ६२ चेंडूत ६२ धावा करुन परतला.

# उपहारापूर्वी आर. आश्विनने दिला वेस्ट इंडिजला चौथा झटका

# मार्लन सॅम्युअल्स १ आणि जरमाइन ब्लॅकवूड ३४ धावावर खेळत आहेत.

# १५ षटकानंतर वेस्ट इंडिज  ३  बाद ४९ धावा.

# ८ षटकानंतर वेस्ट इंडिज ३ बाद १६ धावा.

# राजेंद्र चंद्रिकाचा लोकेश राहुलकने टीपला झेल.

# मोहम्मद शामीने वेस्ट इंडिजला दिला तिसरा धक्का,

# ३ षटकानंतर वेस्ट इंडिज २ बाद ४ धावा

# डॅरेन ब्राव्होलाही इंशातने केले बाद.

# प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजची खराब सरुवात.

# क्रेग ब्रेथवेटने एका धावेवर पुजाराकडे झेल देऊन तंबूत परतला.

# खेळाच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडिजला इशांत शर्माने दिला झटका

# जमैकाच्या मैदानावर वेस्ट इंडिजने  नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय