विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी विराटसेना सज्ज

मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्या वादामुळे भारतीय क्रिकेट पूर्णत: ढवळून निघालेले असताना शुक्रवारीहोणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याचे आव्हान संघासमोर असेल.

योगायोगाची गोष्ट म्हणजे वर्षभरापूर्वी कॅरेबियन दौऱ्यावरच कुंबळे यांच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदाची कारकीर्द सुरू झाली होती; पण कुंबळे यांच्याशी कर्णधार कोहलीचे मतभेद असल्यामुळे वर्षभरातच त्यांना स्वत:हून या यशस्वी वाटचालीपुढे पूर्णविराम द्यावा लागला. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा चालू असताना मैदानावरील कामगिरीपेक्षा कोहली-कुंबळे वादच अधिक चर्चेत राहिला. परिणामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर प्रशिक्षकाशिवायच भारतीय संघ आता खेळणार आहे. ही स्पर्धा चालू असताना वेस्ट इंडिजचा संघ दुबळ्या अफगाणिस्तानविरुद्धही झगडत होता. त्यामुळेच पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे.

कुंबळे प्रकरणात कोहलीची प्रतिमा डागाळली आहे. या पाश्र्वभूमीवर वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना जिंकून क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेण्याची संधी कोहली अजिबात सोडणार नाही. या मालिकेत संघनिवडीसंदर्भात कोहलीला पूर्ण स्वातंत्र्य असेल.

जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत जेमतेम १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यामुळे भारतीय संघाकडून या मालिकेत निभ्रेळ यशाची अपेक्षा केली जात आहे. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या विंडीज संघातील १३ खेळाडूंना एकूण २१३ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे, तर सर्वाधिक अनुभवी जेसन होल्डर ५८ सामन्यांत खेळला आहे. दुसरीकडे युवराज सिंग (३०१), महेंद्रसिंग धोनी (२९१) आणि विराट कोहली (१८४) या तीन खेळाडूंचा अनुभव ७७६ सामन्यांचा आहे.

भारताला या मालिकेत दुसरी फळी अजमावण्याची उत्तम संधी मिळू शकेल. जसप्रित बुमराहला विश्रांती दिल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकेल. चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत एकही सामना त्याच्या वाटय़ाला आला नव्हता. २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर तो एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करू शकलेला नाही.

सलामीवीर फलंदाज रोहित शर्मालासुद्धा विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती दिल्यामुळे अजिंक्य रहाणे सलामीला उतरू शकेल. स्थानिक क्रिकेटमध्ये लक्षवेधी फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या ऋषभ पंतलासुद्धा संधी मिळू शकेल. स्फोटक फलंदाज अशी ख्याती असलेला ऋषभ पहिल्या पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांवर वादळी आक्रमण करतो.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत विंडीजच्या फलंदाजांसाठी लेग-ब्रेक गोलंदाज रशिद खान डोकेदुखी ठरला होता. या पाश्र्वभूमीवर ‘चायनामन’ कुलदीप यादवला भारतीय संघात स्थान देण्याची आवश्यकता आहे. चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत सामान्य कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा यापैकी एकाला विश्रांती दिल्यास कुलदीपला संघात स्थान मिळू शकेल.

संघ

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, उमेश यादव.
  • वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), जोनाथन कार्टर, मिग्युएल कमिन्स, अल्झारी जोसेफ, जेसन मोहम्मद, किरान पॉवेल, केसरिक विल्यम्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेस, शाय होप (यष्टिरक्षक), इव्हिन लेविस, अ‍ॅश्ले नर्स, रोव्हमन पॉवेल.